esakal | गुंतवणूकदारांना गंडवून जमविली कोट्यवधींची माया
sakal

बोलून बातमी शोधा

money

यवतमाळ : गुंतवणूकदारांना गंडवून जमविली कोट्यवधींची माया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जास्त व्याज देण्याचे आमिष दाखविले की, ग्राहक त्या आमिषाला बळी पडतात. नेमकी हिच मानसिकता हेरून परराज्यातील कंपन्यांनी राज्यासह यवतमाळ जिल्ह्यातील गुंतवणूकदारांवर जादा व्याजाचे जाळे फेकले. मात्र, फ्रॉडर्सनी कोट्यवधी रुपयांची माया गोळा करून पोबारा केला. आता पोलिस फवसणूक करणार्‍यांचा शोध घेत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे सध्या राज्य व परराज्यातील पाच फसवणूक प्रकरणांचा तपास सुरू आहे.

अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्घ जीवन मल्टिस्टेटने ५४ लाख रुपयांनी ग्राहकांची फसवणूक केली. लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या आदिवासी विकास महामंडळात ६१ लाख ८७ हजार रुपयांचा घोटाळा खुद्द अधिकारी व कर्मचार्‍यांनी केला. डिझेल पंप लाभार्थ्यांना न देता फसवणूक केली. दारव्हा येथे कार्यालय थाटून जी लाइफ इन्व्हेस्टमेंट कंपनीने ग्राहकांना दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखविले.

जवळपास साडेचारशे गुंतवणूकदारांना एक कोटी २३ लाखांचा गंडा घातला. पुसद येथे एनआयसील कंपनीने चार ते पाच लाख रुपयांनी ग्राहकांची फसवणूक केल्याची बाब पोलिसांच्या रेकॉर्डवर आली आहे. पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामात एक कोटी ३२ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला. सध्या या प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे. मध्य प्रदेशात मुख्य कार्यालय असलेल्या जी लाईफ कंपनीच्या तपासादरम्यान चक्रावून टाकणारे किस्से बाहेर आले.

हेही वाचा: ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभरात मोठा प्रतिसाद; अनेक ठिकाणी तणाव

मास्टरमाईंड गिरीराज पांडे याने आगर जिल्ह्यात २५० एकर शेतीची खरेदी केली. इतरही राज्यात जवळपास एक हजार एकर शेती असल्याचा संशय पोलिसांना आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशात धडक देत शेतजमिनीचे पुरावे गोळा केले. परिसरातील शेतकर्‍यांशीही चर्चा केली. जी-लाइफचा मास्टरमाइंड सध्या परराज्यातील तुरूंगाची हवा खात आहे. कमी वयाचा असतानाच पांडे याने गुंतवणूकदारांची मानसिकता हेरली होती. कोट्यवधींची संपत्ती गोळा केल्यानंतर पाच वर्षे तो गावाकडेही फिरकला नाही. ग्राहकांची फसवणूक करणारे फ्रॉडर्स असे कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीचे मालक बनले. मात्र, आता हिच मालमत्ता पोलिसांच्या रडारवर आहे.

"आर्थिक गुन्हे शाखेकडून सध्या पाच गुन्ह्याचा तपास केला जात आहे. जी-लाइफ प्रकरणाच्या संदर्भात आमचे पथक नुकतेच मध्यप्रदेशात जाऊन आले. त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण दस्तऐवज हाती लागले. ग्राहकांना दामदुप्पट व्याज देण्याचे आमिष दाखवून कंपनी थाटली जाते. ग्राहकही आमिषाला बळ पडल्याने फसवणूक होते. फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या ठेवी सुरक्षीत ठिकाणीच ठेवल्या पाहिजे."

- राजू भारसाकळे, सपोनि, आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ

loading image
go to top