प्रस्तावित बायोइथेनॉल प्रकल्प मकरधोड्यातच होणार...दुसऱ्या मतदारसंघात पळवण्याचा होता प्रयत्न

file photo
file photo

भंडारा : धानाच्या तणसापासून बायोइथेनॉल तयार करण्याचा मकरधोकडा येथील प्रस्तावित प्रकल्प कुठेही हलवू देणार नाही, असे आश्‍वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिल्याने या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

भंडारा विधानसभा मतदारसंघातील मकरधोकडा येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प इतरत्र हलविल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार भोंडेकर यांनी एका निवेदनाद्वारे दिला होता.

एमआयडीसीत जागाही निश्‍चित

भंडारा तालुक्‍यातील मकरधोकडा येथे 2018 मध्ये तणसापासून बायोइथेनॉल तयार करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकरधोकडा येथील एमआयडीसीची 47.75 हेक्‍टर जमीन अधिग्रहीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तसेच या जागेचे बीपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षणही केले होते.

बेरोजगारांसाठी ठरणार उपयुक्त

जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व तरुण बेरोजगारांसाठी उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प सरकार बदलताच साकोली विधानसभा मतदारसंघात नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आक्रमक पवित्र घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.

उद्योगमंत्र्यांचे आश्‍वासन

यासंदर्भात त्यांनी उद्योगमंत्र्यांना मुंबई येथे भेटून या विषयावर चर्चा केली होती. हा प्रकल्प भंडारा तालुक्‍यातील मकरधोकडा येथेच उभारण्यात यावा, असा निर्णय भाजप सरकारने दिला होता. मात्र तो प्रकल्प साकोली विधानसभा मतदारसंघात नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे हा प्रकल्प कुठेही जाणार नाही, असे आश्‍वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. या निर्णयाबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार भोंडेकर यांचे आभार मानले आहेत.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com