esakal | अमरावती : गर्भवतीचा अडेलतट्टूपणा; रुग्णालयाला नकार दिल्याने मृत बालकाचा जन्म
sakal

बोलून बातमी शोधा

amaravati

अमरावती : गर्भवतीने रुग्णालयाला नकार दिल्याने मृत बालकाचा जन्म

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अचलपूर : मेळघाटच्या भिलखेडा गावातील अती जोखमीच्या गर्भवती मातेने प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयात जाण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने मोथा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगलेच वेठीस धरले. अखेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांची गावात एन्ट्री होताच महिला व घरचे रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास तयार झाले. मात्र तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी घरीच प्रसूती केली.

मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील भिलखेडा गावातील अती जोखमीच्या मातेला प्रसूतकळा सुरू झाल्याची माहिती आशासेविकेने मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर डॉक्टर नीता नागले, आरोग्यसेविका हिना सौदागर १०८ रुग्णवाहिकेतून त्या महिलेच्या घरी पोहोचल्या. सदर गर्भवती महिला अती जोखमीच्या कक्षात येत असल्याने घरी प्रसूती करणे धोकादायक होते. सदर महिला गर्भवती असताना पाच वेळा रक्त दिल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मिळाली. करिता तिला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे अत्यंत आवश्यक होते.

हेही वाचा: लातूरात पालकानेच केला तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

मात्र ती महिला आणि तिचे नातेवाईक रुग्णालयात जाण्यास स्पष्टपणे नकार देत होते. इकडे त्या महिलेच्या प्रसूतकळा वाढतच होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. अखेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांची गावात एन्ट्री होताच महिलेचे नातेवाईक आणि ती महिला रुग्णालयात जाण्यास तयार झाले. तोपर्यंत बराच उशीर झाला असल्याने कर्मचाऱ्यांनी घरीच प्रसूती केली. मात्र बाळ मृत जन्माला आले. त्यानंतर त्या महिलेला पुढील उपचारासाठी अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सदर महिला अती जोखमीच्या कक्षेत येत होती. त्यामुळे तिची घरी प्रसूती करणे धोकादायक होते. मात्र घरचे व ती महिला रुग्णालयात येण्यास तयार होत नव्हती. अखेर पोलिस गावात येताच घरचे तयार झाले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला. करिता घरीच प्रसूती केली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

-डॉ. नीता नागले, वैद्यकीय अधिकारी मोथा.

loading image
go to top