भाजप पुन्हा सत्तेत आल्यास शेवटची निवडणूक ठरेल : पृथ्वीराज चव्हाण

BJP will become in Power then that election will be the last election says Former CM Prithviraj Chavan
BJP will become in Power then that election will be the last election says Former CM Prithviraj Chavan

अकोला : राज्यासह देशात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे, ते बघता भाजप पुन्हा सत्तेत आल्यास या देशात लोकशाहीचा गळा घोटला जाईल. ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी अकोला येथे सांगितले.  

ते पुढे म्हणाले, देशात सामाजिक, आर्थिक अराजकतेचे वातावरण आहे. लोकसभेत बहुमत आहे, उद्या राज्यसभेतही बहुमत झाल्यावर या देशाची घटना बदलून लोकशाहीचा गळा घोटला जाईल. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेत आल्यास ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल. देश हुकूमशाहीच्या खायीत लोटला जाईल, अशा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

विधानसभेत सभापतीविरुद्ध अविश्‍वास प्रस्वाव मांडल्यानंतर त्यावर १४ दिवसांत निर्णय येणे आणि त्यानंतर सात दिवसांत सभागृहात चर्चा घेऊन मतदान घेणे, नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, बहुमत असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने चर्चाच नाकारली. उलट विधानसभेच्या कामकाजाच्या सूचित विषय नसताना मुख्यमंत्री स्वतः सभागृहात विश्‍वास ठराव मांडतात आणि कोणतीही चर्चा न करता तो पारित करून अधिवेश गुंडाळले जाते. ही हुकमशाहीची सुरवात नाही तर काय, असा प्रश्‍नही चव्हाण यांनी उपस्थितांना केला.

राज्यात गुंतवणुकीचे मोठेमोठे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. मात्र, ही गुंतवणूक कुठे झाली, याची माहिती सरकार देत नाही. माहिती अधिकारात विचारले तर त्याचे उत्तर मिळत नाही. या राज्यातील ३२ हजार पैकी १० टक्के कारखाने चार वर्षात बंद पडली. भाजप सत्तेवर आले तेव्हा २४ लाख ४७ हजार नोकऱ्या होत्या. चार वर्षानंतर ही संख्या २० लाखांवर आली आहे. सरकारी नोकऱ्या नाही, खासगी क्षेत्रात संधी नाही, अशी परिस्थिती उद्‍भवली असल्याचे ते म्हणाले.

देशात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून बँका बुडविणारे देश सोडून पळून जात आहेत. अशा बँकांना वाचविण्यासाठी सर्वसामान्यांच्या खात्यातील पैसे बँकेच्या भागभांडवलात कोणतीही सूचना न देता वळती करण्याचा कायदा या देशात आणण्याचा घाट घातला जात आहे. २०२२ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ट्रिलीयन डॉलर्स करण्याचे स्वप्न दाखविले जात आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वर्षात विकासदर १४ टक्क्यांवर असणे आवश्‍यक आहे. हे शक्य नाही, असे चव्हाण म्हणाले.

पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंत पुरके, खासदार हुसेन दलवाई आणि अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.  

भाजपकडून मित्र पक्षांसाठी साम दंड भेद

देशात भाजपविरोधी वातावरण होत असल्याने मित्र पक्षांना सोबत ठेवण्यासाठी साम दंड भेद निती भाजप वापरत आहे. भाजप व शिवसेना कधीही वेगळे राहू शकत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

सत्ता आल्यास गरजेनुसार कर्जमाफी

शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. त्यामुळे सत्तेत आल्यास गरजेनुसार शेतकऱ्यांना २००९ प्रमाणे पुन्हा कर्जमाफी देण्याच तयारी आहे. हमी भावाचे धोरण जाहीर करू, हमी भावानुसार शेतमाल खरेदी केंद्र सुरू करू आणि हमी भावानुसार शेतमाल विकल्या गेला नाही, तर कर्नाटकप्रमाणे शेतकऱ्यांना हमी भावानुसारच्या तफावतीची नुकसान भरपाई देऊ, असे खासदार चव्हाण यांनी जाहीर केले.    

समविचारी पक्षात मनसे नाही

राज्यात समविचार पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीचा सामना केला जाईल. भाजप व शिवसेनाच्या विरोधातील पक्षांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. समविचारी पक्षात मनसे नसल्याचेही खासदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com