वऱ्हाडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात

मनोज भिवगडे
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

भाजपने विद्यमान आमदारांनाच पुन्हा रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. चैनसुख संचेती, गोवर्धन शर्मा आणि प्रकाश भारसाकळे, लखण मलिक या ज्येष्ठ नेत्यांना पुन्ही उमेदवारी देण्यात आली आहे.

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदारांनाच पुन्हा रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. चैनसुख संचेती, गोवर्धन शर्मा आणि प्रकाश भारसाकळे, लखण मलिक या ज्येष्ठ नेत्यांना पुन्ही उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षांची बहुप्रतीक्षीत उमेदवार यादी मंगळवारी दुपारी १ वाजता दिल्लीत जाहीर करण्यात आली. या यादीनुसार वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

यात अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघात प्रकाश भारसकाळे, अकोला पश्‍चिममधून सहाव्यांदा गोवर्धन शर्मा, अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर आणि मूर्तिजापूर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघामधून तिसऱ्यांदा हरीश पिंपळे यांना उमेदवारी मिळाली आहे. जिल्ह्यातील पाचवा मतदारसंघ बाळापूरमध्ये यापूर्वीच युतीत शिवसेनेचे नितीन देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील भाजपचे चारही विद्यमान आमदार कायम आहेत. मलकापूरमध्ये ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती, खामगावमधून भाजपचे ज्येष्ठ नेते  दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव व विद्यमान आमदार आकाश फुंडकर, जळगाव जामोदमधून कामगार मंत्री डाॅ. संजय कुटे या विद्यमान आमदारांसह चिखलीमधून स्वेता महाले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

वाशीम जिल्ह्यात कारंजा मतदारसंघात विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी तर वाशीम या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघात लखन मलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रिसोड मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आला आहे. यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय विश्‍वनाथ सानप यांना येथून शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे.

त्यामुळे वऱ्हाडात युतीतील भाजप-शिवसेना वगळात इतर मित्र पक्षांची पाटी कोरीच राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, बुलडाणा आणि सिंदखेड राजा हे मतदारसंघ शिवसेनेकडे कायम आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's current MLA in Varhadh again in the arena