खंडणी दे, अन्यथा पती व मुलीला बघून घेऊ! महिलेला धमकी

सुरज पाटील
Saturday, 19 September 2020

महिलेला तब्बल तीस लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी वीस लाख रुपये दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

पुसद, (जि. यवतमाळ) : बनावट चित्रफित तयार करून लुबाडण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. आधी मोठ्या शहरांपर्यंत सीमित असलेले याचे लोण आता गावांपर्यंत पोहोचले आहे. मुली आणि बायका बदनामीला घाबरतात, हे लक्षात घेऊन अशी ठग मंडळी आपले मोहरे हेरुन त्यांना ब्लॅकमेल करीत लाखो कमवित आहेत. अशीच एक तक्रार नुकतीच पुसद येथील महिलेने केली. विशेष म्हणजे या घटनेत महिलाही संशयित आहेत.

पुसद येथील हनुमान वॉर्डातील एका दाम्पत्याने सासूच्या मदतीने एका महिलेची बनावट व्हिडिओ चित्रफीत तयार करून तिला ब्लॅकमेल केले. महिलेला तब्बल तीस लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी वीस लाख रुपये दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

गौरव गायकवाड (वय२८), त्याची पत्नी उमा व पत्नीची आई कमल पाईकराव (रा. गोविंदनगर) अशी खंडणी मागणाऱ्या संशयितांची नावे आहेत. तिघांनी मिळून महिलेच्या फोटोचा बनावट वापर करून अश्‍लिल व्हिडिओ फित तयार केली व सदर व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करू, अशी धमकी देत तीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच तिघांनीही या महिलेस शेगाव किंवा नांदेड येथे चल म्हणून तिच्यामागे तगादा लावला होता.

सविस्तर वाचा - बाभळीच्या झाडाच्या फांद्या छाटल्यावरून झाली हाणामारी; एकाचा खून

फिर्यादी महिलेने सोबत जाण्यात विरोध केला असता तिला अग्रवाल मंगल कार्यालयाजवळील एका घरी बोलाविण्यात आले. तिथे तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही व्हिडिओ फित आरोपींनी व्हायरल करू नये म्हणून महिलेने एका मध्यस्थामार्फत आरोपींना वीस लाख रुपये पाठविल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. आणखी पैसे दिले नाही तर पतीला व मुलीला बघून घेईल, अशी धमकीही संशयितांनी दिली. त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस तिघांचाही शोध घेत आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black melling with one woman