esakal | दोघेही पेशाने प्राध्यापक अन्‌ सार्वजनिक ठिकाणी केले असे अशोभनीय कृत्य...
sakal

बोलून बातमी शोधा

freestyle

प्रा. माणिक चव्हाण यांनी कमरेचा पटटा काढून प्रा. वसंत चव्हाण यांना मारहाण केली. बराच वेळपर्यंत अतिशय आक्रमकपणे चाललेली ही "फ्रिस्टाईल' परिसरातील अनेकांनी स्वतः अनुभवली.

दोघेही पेशाने प्राध्यापक अन्‌ सार्वजनिक ठिकाणी केले असे अशोभनीय कृत्य...

sakal_logo
By
संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : पैशाच्या देवाण- घेवाणीतून वरिष्ठ महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांमध्ये अनेक दिवसांपासून वाद होता. हा वाद पुन्हा उफाळून त्यांच्यात सोमवारी (ता.2) तू-तू मैं-मैं झाली. त्यानंतर ऐन सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यात झालेल्या फ्रिस्टाईलमध्ये एका प्राध्यापकाचे डोकेच फुटले. गोंडपिपरी येथील सुभद्राबाई सांगळा आश्रमशाळा परिसरात घडलेला हा प्रकार अनेकांनी स्वतः बघितला. 

पैशाच्या देवाण-घेवाणीचा होता वाद

गोंडपिपरी येथे कला-वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात प्रा. वसंत चव्हाण हे मराठीचे, तर प्रा. माणिक चव्हाण राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून दोघेही अनेक वर्षांपासून महाविद्यालयात कार्यरत आहेत. सोमवारी, 2 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास गोंडपिपरी येथे असलेल्या सुभद्राबाई सांगळा आश्रमशाळेतील एक शिपाई आपली बदनामी करीत असल्याचे प्रा. वसंत चव्हाण यांना कळले. त्याच्याकडून वास्तविकता जाणून घेण्यासाठी प्रा. वसंत चव्हाण त्या आश्रमशाळेत गेले होते. यावेळी संबंधित शिपाई आश्रमशाळेत उपस्थित नव्हता. याच परिसरात प्रा. माणिक चव्हाण यांचे घर आहे. काहीच वेळात माणिक चव्हाण पत्नीसह सुभद्राबाई सांगळा आश्रमशाळा परिसरात आले. तिथे प्रा. वसंत चव्हाण उपस्थित होते. यावेळी जुने पैसे परत न केल्याच्या मुद्यावरून प्रा. वसंत चव्हाण व प्रा. माणिक चव्हाण यांच्यात जबरदस्त हाणामारी झाली. 

अवश्य वाचा- काय राव कसं काय? त्याने मारली शेतमजुराच्या पाठीवर थाप 

अनेकांनी बघितली दोघांमधील फ्रिस्टाईल

प्रा. माणिक चव्हाण यांनी कमरेचा पटटा काढून प्रा. वसंत चव्हाण यांना मारहाण केली. बराच वेळपर्यंत अतिशय आक्रमकपणे चाललेली ही "फ्रिस्टाईल' परिसरातील अनेकांनी स्वतः अनुभवली. हा वाद मिटला असे वाटत असताना दोघेही आपल्या कला- वाणिज्य महाविद्यालयात पोहोचले. याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. या हाणामारीत प्रा. वसंत चव्हाण यांचे डोके फुटले. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. काही वेळात प्रा. माणिक चव्हाण यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली. दोन्ही तक्रारींवरून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे स्वतः या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

गोंडपिपरीत दोन प्राध्यापकांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. दोघांनीही एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणी आम्ही गुन्ह्याची नोंद देखील केली आहे. प्राध्यापकांसारख्या विचारवंतांकडून असा प्रकार घडणे, ही चिंतेची बाब आहे. 
- संदीप धोबे, ठाणेदार, गोंडपिपरी. 
 

loading image
go to top