
महाविकास आघाडी सरकारमध्ये अकोला जिल्ह्यातून एकाही आमदाराची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. त्यामुळे किमान महामंडळतरी पदरात पाडून घेता यावे म्हणून शिवसेनेचे दोन्ही आमदार प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले दोन माजी आमदार महामंडळासाठी इच्छुक असून, त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्या अखेरीस त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे.
अकोला : महाविकास आघाडी सरकारमध्ये अकोला जिल्ह्यातून एकाही आमदाराची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. त्यामुळे किमान महामंडळतरी पदरात पाडून घेता यावे म्हणून शिवसेनेचे दोन्ही आमदार प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले दोन माजी आमदार महामंडळासाठी इच्छुक असून, त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्या अखेरीस त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांच्या नेतृत्त्वात १०० दिवसांचा कालखंड पूर्ण केला आहे. हिवाळी अधिवेशनापाठोपाठ अर्थसंकल्पिय अधिवेशनही पार पडले. आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेध लागले आहेत ते विविध समित्या आणि महामंडळाचे. अकोला जिल्ह्यात महाविकास आघाडीमधील तीन पक्षांपैकी शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. इतर चार मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत.
विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एक शिवसेना तर दुसऱ्या मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत. असे असतानाही राज्याच्या मंत्रिमंडळात अकोला जिल्ह्यातून एकाचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. परिणामी शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार नितीन देशमुख यांना महामंडळाचे वेध लागले आहेत. गोपीकिशन बाजोरिया यांना विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची लॉटरी लागू शकते. मात्र आमदार बाजोरिया कॅबिनेट दर्जाच्या महामंडळासाठी आग्रही आहेत. त्यांची शिवसेनेतील ज्येष्ठता बघता त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपविली जाते हे येत्या काही आठवड्यात स्पष्ट होईल. शिवसेनेच्या दोन आमदारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही महामंडळासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, प्रख्यात व्याख्याते अमोल मिटकरी यांचा समावेश आहे. याशिवाय ज्येष्ठ नेते डॉ.संतोषकुमार कोरपे, डॉ. आशाताई मिरगे यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास इच्छुक असलेले माजी आमदार हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कार यांनाही राष्ट्रवादीकडून महामंडळ किंवा मंडळावर नियुक्ती दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेसकडून अल्पसंख्यांक चेहऱ्याला प्राधान्य
काँग्रेसकडून इच्छुकांची मोठी यादी असली तरी जिल्ह्यातील पक्षाची स्थिती लक्षात घेता प्रतीक्षा यादीवरच अनेकांना समाधान मानावे लागू शकते. त्यातही काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यातून महामंडळ किंवा मंडळावर एखाद्या नेत्याची नियुक्ती करावयाचीच झाली तर अल्पसंख्यांक नेत्यांमधून तरूण चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. शिवाय जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल हेही स्पर्धेत आहेत. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील धाबेकर यांचाही विचार होऊ शकतो.