दिव्यांग "निरूषा'ची बोरवडी आंभोऱ्याची शान

शरद शहारे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

  • कुटुंबासाठी ठरली होती "नकोशी
  • अनेकांना दिला रोजगार

वेलतूर(जि.नागपूर) ः अस्थिव्यंग, विधवा निरूषाच्या आयुष्यात बोरवडीने आनंद फुलविल्याने तिच्या स्वावलंबनाची नवी पहाट उगविली आहे. ही प्रभात आता तिची जगण्याची प्रेरणावाट झाली असून तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव फुलले आहेत.

आंबटगोड चवीचे रानफळ म्हणजे बोरे. टरफले काढून त्यापासून बोरवडी तयार केली जाते. महिलांचे खास आवडीचे फळ म्हणूनही बोरांकडे पाहिले जाते. गरोदरपणात हे फळ महिलांना अधिकच भुरळ पाडत असल्याचे बोलले जाते. पर्यटनास आंभोरा येथे येणाऱ्या पर्यटकांना सध्या तरी तिच्या बोरवडीने चागंलीच भूल घातली आहे. पूजासाहित्याच्या विक्रीसह बोरवडी विक्रीतूनही तिला चांगले उत्पन्न मिळते. जेमतेम होणाऱ्या पूजासाहित्याच्या विक्रीतून तिला उदरनिर्वाह चालविणे फारच कठीण झाले होते. अपंगत्वामुळे कुणी कामही देत नव्हते. त्यात पतीचे अकाली निधन झाले. कुटुंब धरणग्रस्त असले तरी संपूर्ण कुटुंबाची वाताहत झालेली. आप्तस्वकीयांनीही तोंड फिरविले. मात्र कशीबशी नववीपर्यंत शिकलेल्या निरूषा चांदेकर हिने न डगमगता आंभोरा येथे पूजासाहित्याचे छोटे दुकान थाटले. पुढे त्यासोबत पर्यटकांची आवड हेरून आधी हंगामातील ओली, सुकी बोरे विकत व्यवसायाला सुरुवात केली. पुढे गंमत म्हणून घरी बनवलेली बोरवडी विक्रीस ठेवली. बोरवडीची खमंग, आंबट-गोड चव पर्यटकांना चांगलीच भावली. ती चव कायम ठेवत निरूषाने आपल्या अपंगत्वावर मात करीत नवी ओळख निर्माण करण्यात यश मिळविले.

तिने दिला मदतीचा हात
नदीकाठी व आंभोरा जंगलात विपुल प्रमाणात बोरीची झाडे आहेत. फळे पिकल्यावर त्यांचे संकलन करून वाळवण करून त्यांचा विक्रीव्यवसाय केला जातो. बोरकूट करून विकणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी व व्यावसायिक खरेदीदार त्याची खरेदी करतात. तिच्या कुटूंबाचेही हंगामी व्यवसाय म्हणून बोरे संकलन करण्याचे काम होते. त्या बोरांपासून घरीच घरगुती पद्धतीने प्रक्रिया करून सध्या निरूषा बोरवडी थापत असते. सोबत तिच्या हाताने उकळलेली, साखर व गुळात शिजविलेली गोड बोरे साऱ्यांना भावतात. निरूषाच्या जन्मजात अस्थिव्यंगामुळे ती कुटुंबासाठी नकोशी होती. त्यात तिच्या वैधव्याने भर घातल्याने ती अधिकच "नकोशी' झाली होती. पण आता ती साऱ्यांची आवडती झाली आहे. तिने अनेक वृद्ध महिलांना बोरे संकलन व काढणीच्या कामाला लावून मदतीचा हात दिला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bowadi is specielity of aambhora