"जाको राखे साईया मार सके ना कोय'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

नागपूर : रेल्वेतून खाली उतरत असलेला मुलगा अचानक रेल्वे आणि फलाटातील फटीतून थेट रुळावर पडला. घटना बघणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. आई-वडिलांचे अवसानच गळाले. काय करावे सुचत नसताना कुलीबांधव मदतीला धावून आले. वेळीच खटाटोप करीत त्यांनी मुलाला सुखरूप बाहेर काढले. "जाको राखे साईया मार सके ना कोई' या ओळींचा प्रत्यय आणून देणारी ही घटना सोमवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.
गोरखपूर-त्रिवेंद्रम एक्‍स्प्रेस सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर येऊन थांबली. लगबगीनेच प्रवासी फलाटावर उतरत होते. गाडीच्या बी-2 कोचमधून प्रवास करणारा सुमारे सात वर्षांचा मुलगा एकटाच गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करीत होता. अचानक तो गाडी आणि फलाटादरम्यानच्या फटीतून थेट खाली रुळावर पडला. हे दृश्‍य बघणाऱ्या प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. भेदरलेला मुलगासुद्धा रडू लागला. आपलाच मुलगा पडला असल्याचे दिसताच त्याचे आईवडीलसुद्धा धाय मोकलून रडू लागले. गाडी सुरू झाली असती तर अनर्थ ओढवला असता. ही बाब लक्षात घेता प्रवाशांनी मुलाला काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश येत नव्हते. त्याचवेळी कुली संघटनेचे प्रमुख अब्दुल माजिद आणि त्यांचे सहकारी प्रेमसिंग मीना जवळून जात होते. मुलगा रुळावर पडल्याची घटना लक्षात येताच त्यांनी गांभीर्य लक्षात घेतले आणि मदतीला सरसावले. फटीतून मुलाला काढणे अशक्‍य होत असल्याने कुली बांधव पलीकडच्या भागातून आत शिरले आणि मुलाला सुखरूप बाहेर घेऊन आले. या घटनेत मुलाच्या पायाला किरकोळ इजा झाली आहे. मुलाच्या आईवडिलांनी देवदूत बनून धावलेल्या अब्दूल माजिद आणि प्रेमसिंग मीना यांचे मनापासून आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The boy was rescued by a porter