ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा जगातील ‘हॉट’ शहरे

ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा जगातील ‘हॉट’ शहरे

नागपूर - विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, उन्हाच्या लाटेने आता जागतिक पातळीवर आपला प्रभाव टाकला आहे. जगातील सर्वाधिक पाच उष्ण शहरांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा या तीन शहरांचा समावेश आहे. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता वैदर्भींसाठी हा आठवडा आणखी त्रासदायक ठरण्याची शक्‍यता आहे. 

राजस्थानकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे सध्या विदर्भात उन्हाची तीव्र लाट पसरली आहे. ढगाळ वातावरण असूनही सोमवारी विदर्भातील अनेक शहरांमध्ये पारा ४३ अंशांच्या वर होता. ब्रह्मपुरी येथील कमाल तापमानात आणखी वाढ होऊन पारा ४५.९ अंशांवर गेला. त्याखालोखाल तापमानाची नोंद चंद्रपूर (४५.८ अंश सेल्सिअस) आणि वर्धा (४५.५ अंश सेल्सिअस) येथे करण्यात आली. तिन्ही शहरांमध्ये नायजेरियातील बिलमा (४६.४ अंश सेल्सिअस) नंतर सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये ब्रह्मपुरी दुसऱ्या, चंद्रपूर तिसऱ्या आणि वर्धा चौथ्या स्थानावर राहिले. नागपूरच्या तापमानातही किंचित वाढ होऊन पारा ४४.२ अंशांवर आला. प्रादेशिक हवामान विभागाने उन्हाची लाट या आठवड्यात आणखी तीव्र होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. 

मॉन्सूनची प्रगती समाधानकारक 
गेल्या शनिवारी अंदमानात दाखल झालेला दक्षिण पश्‍चिम मॉन्सून आणखी पुढे सरकून दक्षिण अंदमानमध्ये पोहोचला आहे. मॉन्सूनची सध्याची प्रगती लक्षात घेता येत्या दोन-तीन दिवसांत तो उत्तरेकडे सरकण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाच्या भाकितानुसार, मॉन्सून निर्धारित वेळेत म्हणजेच सहा जूनपर्यंत केरळच्या किनारपट्‌टीवर धडकण्याची दाट शक्‍यता आहे. मॉन्सूनची प्रगती अशीच कायम राहिल्यास विदर्भात १५ जूनच्या आसपास जोरदार मॉन्सूनसरी बरसेल, असा प्राथमिक अंदाज आहे. गतवर्षी आठ जूनला मॉन्सूनचे विदर्भात आगमन झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com