दीड दिवसाआड एक विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

विविध पोलिस ठाण्यांत विनयभंगाच्या लागोपाठ तक्रारी दाखल होत आहेत. तपासाचे प्रमाण शंभर टक्के असले तरी दीड दिवसाआड एक विनयभंग होत असल्याची अकोला जिल्ह्याची आकडेवारी सांगते. 

अकोला : हैदराबाद येथील अत्याचार आणि खून प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महिला सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपींना शिक्षा मिळाली जरी असली तर मुली-महिला सुरक्षित आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे. याबाबत जिल्ह्यातील मागील दहा महिन्यांचा आढावा घेतला असता तब्बल २३० विनयभंगाच्या घटना घडल्या असून, ६४ अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

एकीकडे महिला सबलीकरणाचे दावे केले जात असताना मागील दहा महिन्यांत अकोला जिल्ह्यात तब्बल २३० महिलांना विनयभंगाच्या घटनाना सामोरे जावे लागले आहे. पोलिसांकडे जानेवारी ते आॅक्टोबरपर्यंत विनयभंगाच्या घटनांची नोंद झाल्यावरून ही आकडेवारी समोर आली असली तर हा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा असण्याची शक्यता आहे. याच दहा महिन्यांत ६४ अत्याचाराच्या घटनांचीही नोंद झाली आहे. यावरून महिला व तरुणींसाठी हा जिल्ह्यात किती सुरक्षित आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात रोडरोमिओंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असण्याने त्यांच्यावर वचक बसविणाऱ्या यंत्रणांच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांकडे नोंद झालेल्या घटनांमधूनच हे उघड होत आहे.

हेही वाचा - दिव्यांग महीलेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीस कोठडी​

जागरुकतेमुळे गाठतायेत पोलिस ठाणे
प्रत्यक्षात अत्याचार किंवा विनयभंगासारख्या घटनांमध्ये बदनामी पोटी तक्रार देण्यासाठी कुणी पुढे येत नाही. मात्र, अलिकडच्या काळात अकोला पोलिस विभागाने राबविलेल्या जननी-२ या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महिला-मुलींमध्ये झालेल्या जनजागृतीमुळे अत्याचाराविरुद्ध तक्रार देण्यास त्या पुढे येऊ लागल्या असल्याचे चित्र आहे.

टवाळखोऱ्यांच्या आवरा मुस्क्या
शहरांसह जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण भागातील मुली व युवती शिक्षणासाठी येत असतात. यासह नौकरीसाठी किंवा खरेदीसाठी महिलांची ये-जा असते. परंतु सध्या अनेक ठिकाणी महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, मार्केट, उत्सव, यात्रा यासह इतर ठिकाणी हे प्रकार जास्त प्रमाणात होत आहेत. या नराधमांच्या मुस्क्या आवारण्यासाठी पोलिसांना त्यांची यंत्रणा अधिक सक्षम करावी लागणार आहे.

अशी आहे आकडेवारी

वर्ष अत्याचार विनयभंग
2013 46 200
2014 53 219
2015 44 222
2016 70 177
2017 69 211
2018 87 267
2019 64 230

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breach of modesty at akola