अकोल्यात उड्डान पुलाच्या पिल्लरला तडा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

अकोला शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी जेल चौक ते अकोला क्रिकेट क्लबपर्यंत उड्डाण पूल बांधण्यात येत आहे. या उड्डाण पुलाचे उभे पिल्लर उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, आडवे बिम टाकणे व काही भागात स्लॅब टाकण्याचे कामही सुरू आहे. हे काम सुरू असतानाच अशोक वाटिका चौका जवळ असलेल्या 36 क्रमांकाच्या पिल्लरला तडा गेल्याची बाब उघडकीस आली.

अकोला : शहराच्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या अशोक वाटिकेजवळील पिल्लरला तडा गेल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे उड्डाण पुलाच्या दर्जावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. हीबाब लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांसह प्रकल्प संचालकांनी अकोल्यात धाव घेत पाहणी केली. पिल्लरला गेलेला तडा बघता त्याची तांत्रिक तपासणी एनआयटीकडून करून घेण्यात येणार आहे.

अकोला शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी जेल चौक ते अकोला क्रिकेट क्लबपर्यंत उड्डाण पूल बांधण्यात येत आहे. या उड्डाण पुलाचे उभे पिल्लर उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, आडवे बिम टाकणे व काही भागात स्लॅब टाकण्याचे कामही सुरू आहे. हे काम सुरू असतानाच अशोक वाटिका चौका जवळ असलेल्या 36 क्रमांकाच्या पिल्लरला तडा गेल्याची बाब उघडकीस आली. हीबाब राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांना माहिती होताच त्यांनी वरिष्ठ अभियंत्यांसह सोमवारी अकोल्यात दाखल होवून कामाची पाहणी केली.

तुर्तास गांभिर्य नसल्याचा दावा
उड्डाण पुलाच्या पिल्लरला गेलेला तडा हा पिल्लरच्या वरच्या भागात आहे. पिल्लरच्या स्टक्चरला त्यामुळे धोका असल्याचे जाणवत नाही. त्यामुळे तुर्तास गांभिर्य नसल्याचा दावा अभियंत्यांनी केला आहे.

तांत्रिक तपासणीनंतरच निर्णय
उड्डाण पुलाचे काम सुरूच आहे. काँक्रिटला भेगा पडणे स्वाभाविक आहे. मात्र पुढे कोणताही गंभीर प्रकार घडू नये म्हणून पिल्लरला गेलेल्या तड्याची तांत्रिक तपासणी एनआयटीकडून करून घेतली जाणार आहे. त्यानंतरच हा तडा काँक्रिटला वरच्या भागात आहे की संपूर्ण स्टक्चरला आहे याबाबत निश्‍चित कडू शकेल. तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक पी.डी. ब्राह्मणकर यांनी दिली.

...तर लाखोंचा खर्च पाण्यात
उड्डाण पुलाच्या पिल्लरला गेलेला तडा हा स्टक्चरला गेल्याचे सिद्ध झाल्यास पिल्लर पुन्हा नव्याने उभा करावा लागणार आहे. त्यासाठी किमान 50 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे. स्टक्चरला धोका नसल्याने त्याच्या दुरुस्तीचे इतरही तांत्रिक पर्याय उपलब्ध आहेत. हा संपूर्ण खर्च कंत्राटदारालाच करावा लागणार आहे. त्याचा प्रकल्पाच्या एकूण खर्चावर परिणाम होणार नाही. मात्र त्यासाठी कामाच्या गुणवत्तेत कुठेही हयगय केली जाणार नाही, असे प्रकल्प संचालकांकडून सांगण्यात आले.

एनआयटीकडून तपासणी
उड्डाण पुलाच्या कामाला पडलेली भेग ही फार मोठी नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही. प्राथमिक तापसणीत ही क्रॅक वरच्या बाजूला काँक्रिटला असल्याचे दिसून येते. एनआयटीकडून त्याची तपासणी करून घेतली जाईल. त्यानंतरच ही क्रॅक किती गंभीर आहे याची माहिती मिळेल.
- पी.डी. ब्राह्मणकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Break the pillar of a flying bridge in Akola