
धुरामुळे गुदमरुन या बाळांना मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये तब्बल10 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे, अशी माहिती मिळत आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली होती. धुरामुळे गुदमरुन या बाळांना मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. या विभागात 17 बालके होती. यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र, तरीही 17 पैकी 10 बालकांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयात ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातून धूर निघत असल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी कामावर असलेल्या एका स्टाफने दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागामध्ये मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा याची माहिती तातडीने वरिष्ठांना देण्यात आली. सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या या सतर्कतेमुळे 7 बाळांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना म्हटलंय की, अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची निश्चितच काळजी घेतली जाईल. तसेच या घटनेतील मृत बालकांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत केली जाईल. लवकरच रुग्णालयात जाऊन पाहणी करेन, असं राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटलं आहे.