मंडप सजला, पाहुणे मंडळी जमली, सर्व तयारीही झाली, मात्र; नवदाम्पत्याच्या आनंदावर पडले विरजण

सुरेश नगराळे 
Friday, 12 June 2020

कोरोनाच्या संसर्गाबाबत वराच्या कुटूंबासोबत चर्चा केली. काही शेजाऱ्यांनीही नववधूच्या उपस्थितीवर प्रश्‍न उपस्थित करून लग्नाला विरोध केला. त्यामुळे त्यांच्या लग्नाला परवानगी न देता नववधूला क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्याचा निर्णय झाला.

गडचिरोली : कोरोनाच्या संकटामुळे लग्नाची नियोजित तारीख रद्द झाली. त्यानंतर दोन्ही पक्षाकडील लोकांनी चर्चा करून दुसरी तारीख निश्‍चित केली. विवाहामुळे दोन्ही कुटुंबात उत्साहाचे वातावरण होते. मंडप सजला, पाहुणे मंडळी जमली, सर्व काही तयारी झाली मात्र, लग्नाआधीच नववधू-वरावर क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्याची पाळी आली. यामुळे नवदाम्पत्याच्या आनंदावर विरजण पडले असून अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे नवदाम्पत्यावर लग्नाआधीच एकत्र राहण्याचा प्रसंग ओढवला आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्‍यातील रांगी येथील भूषण या युवकाचे लग्न चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्‍यातील आवळगाव येथील रुपाली नामक युवतीशी जुळले. ठरल्याप्रमाणे 24 एप्रिलला लग्नाची तयारी झाली. मात्र, लॉकडाउन तसेच कोरोना संसर्गाच्या समस्येमुळे प्रशासनाकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे विवाह सोहळा रद्द झाल्याची माहिती नातेवाईकांपर्यंत पोचवण्यात आली. त्यानंतर दोन्ही पक्षाकडील मंडळींची लग्नाच्या तारखेबाबत पुन्हा बैठक पार पडली. त्यात पुन्हा दुसऱ्यांदा लग्नाची तारीख निश्‍चित झाली. त्याप्रमाणे 10 जूनला लग्नाचा मुहूर्त ठरला. परंतु याही वेळी कोरोनाचे विघ्न समोर आले. काय करावे आणि काय नाही या विवंचनेत वराकडील मंडळी चिंतेत पडली.

वराने नववधूला गावी आणले

दुसरीकडे वधूकडील मंडळी वराच्या संपर्कात होते. परंतु यावर काहीच तोडगा निघाला नाही. विवाह सोहळ्याच्या आयोजनाला काही तास शिल्लक राहिले. परंतु पर्याय काही सूचला नाही. अखेर लग्नाच्या आदल्या दिवशी वराने मोटारसायकलने वधूचे घर गाठले. मुलगी मुलाच्या घरी लग्न लावण्यासाठी पाठवण्याची पद्धत असल्याने वराने नववधूला आपल्या स्वगावी आणले. भावी वधू घरी आल्याचे बघून वराकडील मंडळी जाम खूष झाली. हळदीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली. नातेवाईक जमले. मात्र, याबाबतची माहिती काही ग्रामपंचायत सदस्यांना मिळताच त्यांनी लग्नघर गाठले.

अवश्य वाचा- किती बॉयफ्रेंड आहेत तुला, मित्राने केली विचारणा आणि...

दोघांची रवानगी क्वारंटाईन सेंटरमध्ये

कोरोनाच्या संसर्गाबाबत वराच्या कुटूंबासोबत चर्चा केली. काही शेजाऱ्यांनीही नववधूच्या उपस्थितीवर प्रश्‍न उपस्थित करून लग्नाला विरोध केला. त्यामुळे त्यांच्या लग्नाला परवानगी न देता नववधूला क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्याचा निर्णय झाला. मात्र, ती एकटीच तेथे कशी राहील, असा प्रश्‍न उपस्थित करून वरानेही तिच्यासोबत क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्याचा आग्रह धरला. अखेर ग्रामस्थांनी त्या दोघांची रवानगी क्वारंटाईन सेंटरमध्ये केली. या केंद्रात सध्या नववधू व वर असे दोघेच आहेत. लग्न सोहळ्यातील आनंदी क्षण विसरून नवदाम्पत्यांना 14 दिवस आता कोरोना कक्षेत काढावे लागणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bride and Groom quarantine before marriage