esakal | बापलेकाची निर्घृण हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बापलेकाची निर्घृण हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारशिवनी (जि.नागपूर)  :  तालुक्‍यातील गुढरी पंडे या गावात पितापुत्राला गोळ्या घालून त्यांना ठार केल्याची घटना रविवारी (ता. 1) दुपारी चारच्या सुमारास घडली. बंडू मेश्राम (वय 62), सूरज मेश्राम (वय 35) अशी मृतक बापलेकांची नावे आहेत. अज्ञात आरोपींनी आधी बंडू मेश्राम यांचा त्यांच्याच शेतात खून केला. नंतर गावात त्यांच्या मुलाला मारण्यासाठी गेले असता पाण्याच्या टाकीजवळ मुलगा सूरज दिसताच त्याच्या डोक्‍यात बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला.
या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण असून कुणीच या घटनेबद्दल काही सांगायला तयार नाही. पोळ्याच्या सणानिमित्त मेश्राम पितापुत्र गोंडेगाव येथे गेले होते. रविवारी दोघेही घरी गुढरी पंडे येथे परतले. पण, दुपारच्या सुमारास बंडू मेश्राम हे शेतात मृतावस्थेत दिसले. त्यांचा मुलगा हा गावात पोळ्याच्या सणानिमित्त जुगार खेळत असल्याच्या ठिकाणी असल्याने मारेकरी मुलाला शोधत गावातील पाण्याच्या टाकीजवळ आले. सूरज दिसताच अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्‍यात गोळ्या झाडून जागीच ठार केले. मेश्राम यांचा अवैध सावकारी व्यवसाय असल्याची चर्चा असून अज्ञात आरोपीच्या संपूर्ण परिवाराला संपविण्याचा कट तर नसावा, असाही तर्क लावण्यात येत आहे. घटनेची माहिती पसरताच परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या खुनाबद्दल कुणीच बोलायला तयार नाहीत. मारेकऱ्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागू शकली नाही. पोलिस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
रामटेक, देवलापार, कामठी, खापरखेडा व इतर ठिकाणी पोलिस दाखल झाले आहेत. घटनेनंतर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. घटनेची माहीती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, पोलिस उपविभागीय अधिकारी नयन आलुरकर, पोलिस निरीक्षक विलास काळे व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

मृताचा अवैध सावकारीचा व्यवसाय
गावात दबक्‍या आवाजात मृत बंडू मेश्राम अवैध सावकारी करीत असल्याची चर्चा आहे. ही हत्या शेतीच्या वादातून करण्यात आली असावी, असे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मृत बंडू मेश्राम हे गावातील रहिवासी नसून काही वर्षांपासून त्यांनी या गावात शेती विकत घेतली होती. त्या शेतीवर ते काम करीत होते. गुढरी पंडे येथे त्यांनी शेतात घर बांधले होते. त्या ठिकाणी मेश्राम कुटुंबीय राहत होते. पोळ्यानिमित्त ते गावी गेले होते. आजच गुढरी पंडे येथे परत आले होते.

loading image
go to top