esakal | पोलिसाचा उद्दामपणा; आमदार, नगरसेवक संतप्त
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

पोलिसाचा उद्दामपणा; आमदार, नगरसेवक संतप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः महापालिकेतील उपनेते बाल्या बोरकर यांना तहसील पोलिस स्टेशनमधील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने उद्धट वागणूक दिल्याने चांगलाच वाद रंगला. घटनेची माहिती मिळताच आमदार कृष्णा खोपडे यांनीही पोलिस स्टेशन गाठले. मात्र, सहायक उपनिरीक्षकाचा उद्दामपणा कमी होण्याऐवजी आणखीच वाढल्याने आमदार खोपडेही संतापले. मात्र, पोलिस निरीक्षकांनी नमते घेतल्यानंतर वाद निवळला.

काल, सोमवारी नंगा पुतळा परिसरातील एका प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली. यात तीन मुलांचा समावेश असून ते निर्दोष असल्याने महापालिकेतील उपनेते बाल्या बोरकर यांनी सायंकाळी तहसील पोलिस स्टेशन गाठले. गुन्हेगाराला शासन करा, परंतु गरीब निर्दोष मुलांना सोडा, अशी विनंती बाल्या बोरकर यांनी केली. मात्र, यावेळी पोलिस स्टेशनमध्ये असलेले सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी बोरकर यांच्याशी बोलताना उद्धट व शिवराळ भाषेचा वापर केल्याचे समजते. बोरकरांची विनंती फेटाळताना पाटील यांनी त्यांना अपमानस्पद वागणूक दिली. या वादाची माहिती आमदार कृष्णा खोपडे यांना झाली. ते लगेच पोलिस स्टेशनमध्ये आले. मात्र, पाटील यांचा तोरा कायम होता. लोकप्रतिनिधींना दिलेल्या वागणुकीवरून खोपडे चांगलेच संतापले. आमदार खोपडे, बाल्या बोरकर यांनी यावेळी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांचे पाटील यांच्या वागणुकीकडे लक्ष वेधले.

नागरिकांनाही बसला धक्का
आरोपी म्हणून अटकेतील एका मुलाच्या वडिलांकडून पाटील यांनी 50 हजार रुपये व त्यांचा मोबाईल हिसकावल्याचेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पाटील यांनीही 50 हजार घेतल्याचे मान्य करीत ते परत केले. अखेर तीन मुलांना सोडण्यात आले. मात्र, चौकशीसाठी उद्या सकाळी बोलावण्यात आल्याचे बाल्या बोरकर यांनी सांगितले. पोलिसांच्या या उद्दामपणाचा बाल्या बोरकर, आमदार खोपडे यांच्यासोबत आलेल्या नागरिकांनाही धक्काच बसला.
तपास अधिकारी बदलला
हातठेला चालकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांच्याकडून तपास काढून तो तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) सागर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यानंतर प्रकरण निवळले.

loading image
go to top