esakal | बिल्डरने दिले १२ टक्के व्याजाचे आमीष अन् घातला गुंतवणूकदाराला गंडा 
sakal

बोलून बातमी शोधा

indian rupee

आमच्या संस्थेत पैसे ठेवल्यास आम्ही 12 टक्‍के व्याज देत असून पैशाची हमीसुद्धा घेतो, असे सांगितले. रामचंद्र चहांदे यांना वारंवार फोन करून विश्‍वासात घेतले. त्यामुळे चहांदे यांनी 1 लाख 83 हजार 990 रुपयांची गुंतवणूक केली.

बिल्डरने दिले १२ टक्के व्याजाचे आमीष अन् घातला गुंतवणूकदाराला गंडा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : वार्षिक 12 टक्‍के व्याजदराचे आमिष देऊन दोन लाखांचा गंडा घालणाऱ्या नांदेड येथील सयोग बिल्डर ऍण्ड रिअल इस्टेटच्या संस्थापक अध्यक्षाला शहर पोलिसांनी नांदेड येथून अटक केली. सुरेंद्रप्रसाद शंकर विश्‍वकर्मा (रा. नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक न्यू म्हाडा कॉलनी पिपरी (मेघे) येथील रामचंद्र श्‍यामराव चहांदे यांना नांदेड येथील सयोग बिल्डर ऍण्ड रिअल इस्टेटचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्रप्रसाद विश्‍वकर्मा, संचालक हेमलता सुरेंद्रप्रसाद विश्‍वकर्मा, सुनील निवृत्ती जाधव (सर्व रा. नांदेड) व सोपान नामदेव खंडारे (रा. कोलासर, ता. नांदुरा, जि. बुलडाणा) यांचा फोन आला. आमच्या संस्थेत पैसे ठेवल्यास आम्ही 12 टक्‍के व्याज देत असून पैशाची हमीसुद्धा घेतो, असे सांगितले. रामचंद्र चहांदे यांना वारंवार फोन करून विश्‍वासात घेतले. त्यामुळे चहांदे यांनी 1 लाख 83 हजार 990 रुपयांची गुंतवणूक केली. मुदत संपल्यानंतर चहांदे यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी नकार दिला. उलट त्यांनाच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. या संस्थेने महाराष्ट्रात दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची शक्‍यता आहे. 

अवश्य वाचा- ...तर ताडोबातील  वाघांचे अस्तित्व येणार धोक्यात! हे आहे कारण...

दरम्यान, यातील मुख्य आरोपी सुरेंद्रप्रसाद विश्‍वकर्मा हा जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराकरिता दुय्यम निबंधक कार्यालय भोकर, जि. नांदेड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तिथे सापळा रचला. मात्र, पोलिसांची भणक लागताच तो तिथे आला नाही. पोलिसांनी आरोपीचे लोकेशन घेतले असता तो बजरंग कॉलनी, नांदेड येथे असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेऊन शहर ठाण्यात आणले. आरोपी पीसीआरवर आहे.