उंदरांनी जाळली इमारती; दोन वर्षांनंतरही पुनर्बांधणीचा प्रस्ताव धुळखात

file photo
file photo
Updated on

अमरावती : दोन वर्षांपूर्वी उंदरांच्या उपद्रवाने आग लागून क्षतिग्रस्त झालेल्या ऐतिहासिक वास्तूच्या पुनर्बांधणीसाठी महापालिकेस अजूनही जाग आलेली नाही. शिक्षण विभागातून बांधकाम विभागाकडे इतकाच प्रवास या कामाच्या फाईलचा झाला असून सद्यःस्थितीत ती बांधकाम विभागातील टेबलवर धूळखात पडली आहे. 

6 ऑक्‍टोबर 1928 ला अमरावती शहरातील प्रसिद्ध नेहरू मैदानातील कै. नानासाहेब गोखले स्मृती भवनाचे उद्‌घाटन आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते झाले. ब्रिटिशांच्या राजवटीत स्थापन झालेली ही वास्तू कालांतराने नगरपरिषदेच्या व आता महापालिकेच्या मालकीची झाली आहे. या वास्तूत माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली. ब्रिटिशांच्या काळातील या वास्तूत त्यावेळीही शाळा होती व तेथून अनेक नामवंत तयार झालेत. सामाजिक, राजकीय व स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी नाव कमावले आहे. 

नेहरू मैदानातील "लाल डब्बा' 

दुमजली या ऐतिहासिक वास्तूत महापालिकेची हिंदी मुलींची व हिंदी बॉईज, अशा दोन माध्यमिक शाळा भरत होत्या. नेहरू मैदानातील "लाल डब्बा' अशी या शाळेची ओळख आजही जुन्या पिढीतील लोक सांगतात. तीच ओळख नव्या पिढीतही कायम आहे. शहरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा हा मोठा आधार आहे. 14 फेब्रुवारी 2018 ला सायंकाळी साडेसातच्या दरम्यान शाळेच्या पहिल्या माळ्यावरील प्रयोगशाळेस उंदरांच्या उपद्रवाने आग लागली. प्रयोगशाळेतील ऍसिडच्या बॉटल्स फुटल्या व आग लागली, असा निष्कर्ष काढण्यात आला. आगीचे लोट संपूर्ण शहराने बघितले. धो धो करीत जळत प्रयोगशाळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून बेचिराख झाली. अग्निशमन दलाने जिकरीने आग विझवत शाळेचा बराच भाग वाचविण्यात यश मिळवले. मात्र प्रयोगशाळा क्षतिग्रस्त झाली. 

इमारतीचा हा भाग धोकादायक

महापालिकेने स्ट्रक्‍चरल ऑडिट केल्यानंतर इमारतीचा हा भाग धोकादायक जाहीर करून शाळा बंद केली. शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता मुलींची शाळा तालाबपुरा येथील शाळेत स्थानांतरित करण्यात आली, तर मुलांची शाळा सुस्थितीत असलेल्या तळमजल्यावर सुरू आहे. महापालिकेने शैक्षणिक नुकसान टाळण्यात यश मिळवले असले तरी वास्तूच्या सुधारणेबाबत उदासीनता कायम ठेवली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्ट्रक्‍चरल ऑडिटमध्ये पुनर्बांधकामाचा प्रस्ताव देण्यात आला. शिक्षण विभागाने तो बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. तेव्हापासून तो बांधकाम विभागांत धूळखात पडला आहे. या कालावधित दोन आयुक्त बदलून गेलेत व तिसरे नुकतेच रुजू झाले आहेत. 

प्रस्ताव दिला आहे 

नेहरू मैदानातील शाळेची इमारत ऐतिहासिक वारसा आहे. हेरिटेजमध्ये तिचा समावेश आहे. तिच्या पुनर्बांधणीकरिता प्रस्ताव बांधकाम विभागाकडे दिला आहे. प्रयोगशाळा पुन्हा उभारल्यास शाळेला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असे शिक्षणाधिकारी डॉ. अब्दुल राजिक यांनी सांगितले. 

फाईल बोलावून कारवाई करू

 या वास्तूच्या दुरुस्तीसंदर्भात नेमका प्रस्ताव काय आहे ते बघावे लागणार आहे. बांधकाम विभागाकडून माहिती मागवून घेऊन त्यावर किती निधी लागणार आहे ते बघून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com