बुलडाणा : जि.प.च्या शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Buldana Zilla parishad school bad condition

बुलडाणा : जि.प.च्या शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा

किनगावराजा - येथील जिल्हा परिषदेच्या कन्या प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. शाळेची इमारत जीर्ण झाली असून शाळेतील एक शिकस्त खोली ही पूर्णपणे मोडकळीस आल्याने इयत्ता पहिल्या व तिसऱ्या वर्गाच्या मुलींचे शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे

गेल्या वर्षी दुसऱ्या व चवथ्या वर्गाच्या मुलींना एकत्र बसवून शिक्षणाचे धडे हे एकत्रपणे दिल्या जात होते त्यामुळे मुलींचे शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकप्रकारे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू असल्याचा प्रकार मात्र शिक्षण विभागाकडून थांबता थांबेना. यापूर्वीही ही समस्या मांडून यासंदर्भात दैनिक सकाळकडून १२ मेस वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधण्यात आले होते.

त्यानंतर सकाळच्या बातमीचा धसका घेत १७ मेस शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी व बांधकाम संदर्भातील संबंधित विभागाचे शाखा अभियंता यांनी भेट दिली व मोडकळीस आलेल्या शिकस्त खोलीची पाहणी केली त्यामुळे शाळा समिती ,पालकांसह शिक्षकांनाही अपेक्षा होती की आता तरी कुठेतरी काम होईल. त्यांनी पाहिजे त्या प्रमाणात या समस्येची दखल न घेता लक्ष दिले नाही.

त्यामुळे कुठल्याही प्रकारचे काम न करता वर्ग बदलून चालढकलपणा करण्यात आला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्गाची स्थिती ही जशास तशी कायम आहे त्यामुळे शाळा उघडल्यानंतर परिस्थिती बदलेल असा विश्वास होता पण आता तीच परिस्थिती असल्यामुळे शिक्षकांसह, विद्यार्थी मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे म्हणून एवढ्या विशेष व गांभीर्य जनक समस्येकडे दुर्लक्ष करून चिमुकल्यांच्या जिवाशी व शिक्षणाशी हेतूपुरस्कार खेळण्याचा प्रकार शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या कृतीतून व पाहणीतून लक्षात येत आहे.

शिक्षकही बोलतात पण दबक्या आवाजातून

या संदर्भात काही दबक्या आवाजात शिक्षकही बोलत आहे की दोन वर्ग एकत्रित बसल्याने दोन वेगवेगळ्या वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिकवावे तरी कसे. मागील वर्षी कोरोना या महामारीमुळे शाळा या अनियमितपणे चालायच्या विद्यार्थी कमी यायचे त्यामुळे दुसर्‍या व चौथ्या वर्गाचे धकवून घेण्यात आले. मात्र यावर्षी शाळा या नियमित चालू झाल्याने पहिल्या व तिसऱ्या वर्गाच्या विद्यार्थिनींना कसे शिकवावे हेच कळेनासे झाले आहे तर दोन वर्ग एकत्रित बसल्याने जवळपास दहा ते पंधरा दाखले यावर्षी शाळेतून कमी झाल्याचा सूरही शिक्षकांनी लगावला त्यामुळे जर असेच चालू राहिले तर दाखल्याची ही गळती अशीच चालू राहील व पालकांशी चर्चा करणे देखील कठीण होईल. त्यामुळे वरिष्ठांनी ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अशाही भावना शिक्षकांकडून दबक्या आवाजात व्यक्त करण्यात आल्या.

सदर खोली ही शिकस्त नसून त्या खोलीत किरकोळ स्वरूपाची दुरुस्ती आहे व ती दुरुस्ती करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहे दहा ते वीस हजार रुपयांत मोडकळीस आलेली खोली ही दुरुस्त होते त्यामुळे सदर खोली ही शिकस्त मध्ये टाकता येत नाही असा अहवाल संबंधित इंजिनिअरने दिला आहे त्याचबरोबर मुलांच्या शाळेतील एक खोली ही कन्या शाळेसाठी देण्यात येईल व एक वर्ग त्या खोलीत बसवण्यात येईल.

- तुकाराम आदबने, गटशिक्षण अधिकारी, सिंदखेड राजा.

मोडकळीस आलेल्या शिकस्त वर्गखोलीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल खोली दुरुस्त होईपर्यंत दोन्ही वर्ग एकत्र बसतील व जर काही पर्याय उपलब्ध असेल तर दोन्ही वर्ग वेगवेगळे बसवण्यात येतील.

- किशोर पागोरे, जिल्हा शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

Web Title: Buldana Zilla Parishad School Bad Condition Education Department Girls School

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..