सांडांसह मोकाट गायींची धरपकड सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नागपूर : महापालिकेने रस्त्यांवरील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी सांड, गायींसह 22 जनावरे पकडण्यात महापालिकेला यश आले. मात्र, मानकापुरात जनावरे मालकांनी तीव्र विरोध करीत कारवाईत खंड पाडला. नागरिकांनी पोलिसांनाही शिवीगाळ केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जनावरमालकांनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. 

रस्त्यांवरील मोकाट जनावरांच्या कळपामुळे वाहनधारकांवर अपघाताची टांगती तलवार आहे. "सकाळ'ने याबाबत ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर महापालिकेने रस्त्यांवरील मोकाट जनावरांवर कारवाईचे नियोजन केले. डुकरं पकडणाऱ्या तमिळनाडूतील पथकाला महापालिकेने सांड व गायी पकडण्यासाठी आमंत्रित केले. तमिळनाडूतील पथक सोमवारी सकाळी शहरात दाखल झाले. आजपासून रस्त्यांवरील मोकाट जनावरे पकडण्यास सुरुवात केली. मानकापूर येथे मोकाट जनावरे पकडण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मानकापूर पोलिस स्टेशनला कुमक मागितली होती. मानकापूर पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेच्या पथकाने तमिळनाडूतील पथकासोबत जनावरे पकडण्यास सुरुवात केली. मात्र, काही वेळातच जनावर मालकांनी त्यांची जनावरे हाकलून लावण्यात यश मिळवले. त्यामुळे कारवाईत खंड पडला. पोलिसांनी जनावर मालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाच शिवीगाळ करण्यात आली. परिणामी येथे तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे जनावर मालक पळून गेले. मात्र, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे संकेत पोलिसांनी दिले. 
त्यानंतर गोरेवाडा तसेच झिंगाबाई टाकळी परिसरात रस्त्यांवरील जनावरांना पकडण्यात आले. एकूण 22 जनावरे पकडण्यात आली. यात दोन सांड असून इतर गायी व म्हशी असल्याचे मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले. यातील 1 गाय गोरक्षणला तर इतर कोंडवाड्यात पाठविण्यात आल्या. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात कोंडवाडा निरीक्षक गजभिये, तमिळनाडूतील पथकातील कर्मचारी यांनी केली. यावेळी पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांनी कारवाईदरम्यान भेट दिली. मानकापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शेख, वाहतूक सहायक पोलिस निरीक्षक फर्नांडिस यांनी कारवाईदरम्यान सहकार्य केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The capture of Mokat cows with bulls started