व्यापाऱ्यास लुटणाऱ्या एकास पकडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

वसमत तालुक्यातील हयातनगर भागांमध्ये एका सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील एकाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केली आहे.

हिंगोली : वसमत तालुक्यातील हयातनगर भागांमध्ये एका सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील एकाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केली आहे. रविवारी ( ता. ८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास  हा प्रकार घडला आहे.

पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील गंगाधर भोसले व हनुमान भोसले यांचे हयातनगर येथे योगेश ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. नेहमीप्रमाणे भोसले बंधू रविवारी (ता. ८) रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करून गावाकडे निघाले होते. यावेळी हयातनगर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आवई शिवारामध्ये एका जीपमध्ये काही चोरटे त्यांची वाट पाहत होते. भोसले यांची दुचाकी आवई शिवारात मध्ये येताच जीपमधून उतरलेल्या चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भोसले बंधू घाबरून गेले डोळ्यात मिरची पूड टाकल्याने नेमकी काय होत आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. मात्र हातातील पैशाची व सोन्याची बॅग चोरटे ओढत होते. यावेळी हनुमान भोसले यांनी त्या परिस्थितीतही त्यांच्या भ्रमणध्वनीवरून त्यांच्या भावाला तसेच हयातनगर येथील गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली गावकऱ्यांचा मोठा जमाव येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तिथून पळ काढला. मात्र चोरटा गावकऱ्यांच्या हाती लागला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या संशयित चोरट्यास ताब्यात घेतले असून, घटनास्थळावर असलेली जीपही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चोरट्याची कसून चौकशी सुरू असल्याचे हट्टा पोलिसांच्या पथकाने सांगितले. दरम्यान, डोळ्यात मिरची पूड गेल्यामुळे तसेच चोरटयांच्या  मारहाणीमुळे जखमी झालेल्या भोसले बंधूंना उपचारासाठी पूर्णा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Captured one of the robbers in hingoli district