esakal | शहानूर नदीपात्रात पडली कार, घातपाताचा संशय
sakal

बोलून बातमी शोधा

shahanoor river

शहानूर नदीपात्रात पडली कार, घातपाताचा संशय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दर्यापूर (जि. अमरावती) : तालुक्यातील भामोद येथील शहानूर नदीपात्रात (shahanoor river daryapur) एक कार पडल्याचे आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आले. यावरून तातडीने महसूल विभाग व येवदा पोलिस (yevada police) घटनास्थळी पोहोचले. रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे.

हेही वाचा: २१ दिवसांचा संसार पाण्यात बुडाला, नवदाम्पत्याला एकाच सरणावर निरोप

दर्यापूर तालुक्यातील भामोद या गावाच्या महामार्गावरून तब्बल २०० मीटर अंतरावर शहानूर नदी वाहते. महामार्गावरून शहानूर नदीपात्रात जाण्याकरिता शेतशिवार व चिखल तुडवित जावे लागते, अशा स्थितीत सदर कार शहानूर नदीपात्रात उलटी पडल्याचे निदर्शनास आल्याने हा अपघात आहे की घातपात, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आज सकाळी शेतशिवारात जाणाऱ्या काही लोकांना नदीपात्रात उलटी कार पडल्याचे दिसून आले. नदीला भरपूर पाणी असल्यामुळे कारचे केवळ टायर हे पाण्यावर तरंगत असल्याचे दिसत आहेत. तहसीलदारांसह महसूल विभागातील अधिकारी घटनास्थळी रवाना झालेत. कार कोणाची व कारमध्ये कोण आहेत, यासंबंधात कोणतीही माहिती वृत्त लिहीस्तोवर प्राप्त झाली नाही. महसूल विभागाने रेस्क्यू टीमला तातडीने हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. सद्यस्थितीत रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली नाही. सदर कार पाण्यामध्ये उलटी पडून असल्यामुळे कारमध्ये कोणी आहे किंवा नाही, या संबंधात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार अपघात सकाळी पहाटे घडला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र रेस्क्यू टीम आल्याशिवाय यासंबंधात कोणतीही पुष्टी करता येणार नाही. तहसीलदार योगेश देशमुख, तहसीलदार गाडेकर, येवदा पोलिस ठाणेदार अमोल बच्छाव, भामोदचे तलाठी व सरपंच आदी घटनास्थळी पोहोचले आहेत. परिसरातील काही पोहोणाऱ्या युवकांनी या कार्यात मदत करण्याचे प्रशासनाला सांगितले आहे. सदर ऑपरेशन रेस्क्यू टीम आल्यानंतर सुरू होईल.

loading image
go to top