
तीन तलाक प्रकरणी पोलिसावरच गुन्हा दाखल
वणी (जि. यवतमाळ) : मुस्लीम महिला विवाह अधिनियमअंतर्गत वणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील आरोपी हा पोलिस कर्मचारी असून, त्याने तलाक, तलाक, तलाक असे म्हणत निघून गेल्याची तक्रार पत्नीने नोंदवली होती.
प्राप्त माहितीनुसार, इम्रान दिवाण खान (४०, रा. रवीनगर) हा वणी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्याचे पत्नी सोबत सतत घरगुती कारणावरून खटके उडत होते. तसेच शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. इम्रान खान याने पत्नीला तलाकसाठी सात लाख रुपये देतो असे कबूल केले होते. ही घटना १ एप्रिल २०१९ ते ८ आक्टोबर २०२१ या काळातील आहे. त्या रकमेतील अडीच लाख रुपये दिल्यानंतर उर्वरित रक्कम जून २०२१ मध्ये देतो असे सांगितले होते. परंतु, आजपर्यंत रक्कम देण्यात आली नाही, असे तक्रारीतून स्पष्ट करण्यात आले आहे.
इम्रान याला पत्नीने आपण सोबत राहू असे म्हटले असता आरोपीने ‘मी तुझ्या सोबत राहत नाही’ असे म्हणून पत्नीला तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असे म्हणून तेथून निघून गेला. अशा तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वणी पोलिस ठाण्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असावा असे बोलले जात आहे.