

नागपूर : केंद्र सरकारने जिल्ह्यात पाच नवीन कोळसा खाणींना (new mining in nagpur) परवानगी दिली आहे. शहराच्या आसपास तीन औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आणि अनेक कोळसा खाणी असल्याने जिल्ह्यात प्रदूषणाचा स्तर (pollution in vidarbha) दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळेच तापमान असह्य होत आहे. यास्थितीत पुन्हा कोळसा खाणींना मंजुरी दिल्याने पर्यावरणवादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
केंद्र शासनाने कोळसा विक्रीच्या उद्देशाने खाणींची लिलाव प्रक्रिया सुरू केली. या खाणी खासगी क्षेत्रांना वितरित केल्या जाणार आहेत. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यात दहेगाव/मकरधोकडा ४, गौंडखैरी, खापा व विस्तार, दहेगाव-धापेवाडा व टोंडखैरी खंडाळा, हिंगणा बाजारगाव व कळंबी कळमेश्वर येथे नवीन कोळसा खाणी प्रस्तावित आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या भिवकुंड येथे खाण प्रस्तावित आहे. गोंडखैरी कोल ब्लॉक अदानी पॉवरला तर भिवकुंड कोल ब्लॉक सनफ्लॅगला वितरित करण्यात आली आहे. कोळसा खाणींना मंजुरी देण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विदर्भ एनव्हायर्नमेंट ॲक्शन ग्रुप (व्हीआयएजी)ने तीव्र विरोध केला आहे. ग्रुपचे संयोजक सुधीर पालीवाल म्हणाले, विदर्भ आधीच खाणी आणि औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणाने पीडित आहे. अशात नवीन कोळसा खाणी सुरू केल्यास प्रदूषणाचा स्तर प्रचंड वाढेल. नागरिकांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागेल. या नवीन खाणींमधून निघणाऱ्या कोळशाचा उपयोग स्वाभाविकपणे विद्युत केंद्रातच केला जाणार आहे. विदर्भात आधीच मुबलक प्रमाणात विजेचे उत्पादन केले जाते. त्या प्रदूषणाचा त्रासही येथील नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. नवीन वीज केंद्रे या प्रदूषणात आणखी भर घालणार आहेत.
...तर विदर्भ सर्वाधिक प्रदूषित -
धक्कादायक म्हणजे एकाही वीज केंद्रावर प्रदूषण रोखण्यासाठी एफजीडी प्लॅन्ट लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या नव्या खाणी सुरू झाल्या तर विदर्भ हे देशातील सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र म्हणून ओळखले जाईल, असा धोका त्यांनी व्यक्त केला. नवीन कोळसा खाणी नागपूर शहराच्या २५ किलोमीटरच्या परिघात आहेत. मात्र, यांची बोली लावण्यापूर्वी कोळसा मंत्रालयाने पर्यावरणाबाबत आवश्यक कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नसल्याचा आरोपही केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.