व्हिडिओ पहाः चैत्या आजही म्हणतो...आई मला शाळेला जायचंय, जाऊ देणं वं!

chitya
chitya

अकोला: चित्रपटातलं हे गीत आज प्रेक्षकांच्या पसंतीला आल्यानं त्या गीताला अल्पावधीतच प्रसिध्दीमिळाली असली तरी वैयक्तीक आयुष्यात ‘आई मला शाळेला जायचंय, जाऊ देणं वं!’ असं म्हणण्याची वेळ खुद्द हे गीत पडद्यावर साकारणाऱ्या चैत्या अर्थात श्रीनिवास पोफळे याच्यावर आली आहे. अमरावतीच्या या इवल्याशा पोरानं सर्वोत्कृष्ट बालकलावंताचा पुरस्कार नाळ चित्रपटातील चैत्याच्या भुमिकेसाठी उपराष्ट्रपतींच्या हस्ते मिळविला आहे. पुरस्कार वितरण सोहळयानंतर शुक्रवार (ता.28) श्रीनिवास अकोल्यात दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात कौतुकाचा विषय ठरला. यावेळी संवाद साधताना त्याने शाळेला, खेळायला जाण्यासाठी वेळ कमी असल्याचे मनोगत व्यक्त केले.


स्व.डॅडी देशमुख यांच्या स्मृतीत आयोजत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने प्रसिध्द साहित्यिक, अभिनेते किशोर बळी यांनी प्रकट मुलाखत घेतली. दरम्यान चैत्या म्हणजेच श्रीनिवास पोफळे सभागृहात कुतुहलाचा विषय असल्याने प्रत्येक रसिक त्याचा संवाद अगदी मनापासून एकत होता.
यावेळी श्रीनिवास म्हणाला, मी अमरावतीच्या साक्षरा पॅराडाईज स्कूलमध्ये पाचवीत शिकतो. शुटींग सुरू होती तेव्हा मी दुसरीत होतो. शाळेमध्ये वेगळी ट्रिटमेंट नाही मिळत. होमवर्क करावाच लागतो. शाळेतील शिक्षिका गंमतीने म्हणतात की, ‘तुझ्या डायरेक्टरला सांग आम्हाला हिरोईनचा रोल दयायला. हिरोईनचा नाहीतर आजीचा रोल दिला तरी चालेल.’ नाळ चित्रपटानंतर मला पहिल्यासारखे बाहेर मित्रांसोबत खेळायला मिळत नाही. पतंग उडवायला आवडते. पण आता मला पतंग उडविता येत नाही. बाहेर निघालो की, लोक सेल्फी घेण्यासाठी घोळका करतात.

अभ्यास तर करावाच लागतो
शुटींगची वेळ असली तर माझे पप्पा माझ्या शाळेत सुटीचा अर्ज देतात. शुटींग पूर्ण झाल्यानंतर शाळेत आल्यानंतर जो पण अभ्यास शिकविला असेल, ते शिक्षकांकडून समजवून घेतो. वर्गमित्रांकडून वह्या घेवून अभ्यास पूर्ण करतो.

मी दुसरीत नाही, पाचवीत!
श्रीनिवास पोफळे याला नाळ चित्रपटाने मोठा लौकीक प्राप्त करून दिला. वारंवार त्याला दुसरीत असलेला म्हटल्यावर तेवढ्याच तत्परतेने तो म्हणाला, ‘मी दुसरीत नाही, पाचवीत आहे. जेव्हा शुटींग चालू होतं ना, तेव्हा मी दुसरीत होतो.’ हे त्याचे बोबडे बोल एकताच सभागृहात हशा पिकला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com