चिंताजनक! अवकाळी पावसामुळे उघड्यावरचं धान्य सडण्याची शक्‍यता; गोदाम झाले हाऊसफुल्ल

प्रशांत झिमटे 
Sunday, 21 February 2021

सविस्तर वृत्त असे की, आरमोरी तालुक्‍यातील धान उत्पादक शेतकरी हे गेल्या तीन महिन्यापासून धान विक्री करण्यासाठी आपापले नंबर लावून वाट पाहत होते आणि जवळपास तीन ते चार गोदाम पूर्णत: खरेदी करून फुल्ल झाले आहेत.

आरमोरी (जि. गडचिरोली) : आरमोरी येथे गेल्या तीन महिन्यांपासून धानखरेदी केंद्र सुरू होते. परंतु सर्व गोदामे धान्याने परिपूर्ण भरलेली असल्याने बुधवार (ता. 17) पासून येथील धानखरेदी केंद्र पूर्णत: बंद झाले आहे. शिवाय बरेच धान उघड्यावर असून सध्या वातावरणात बदल झाल्याने अवकाळी पावसामुळे हे धान सडत आहेत. त्यामुळे गोदामांची तत्काळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, आरमोरी तालुक्‍यातील धान उत्पादक शेतकरी हे गेल्या तीन महिन्यापासून धान विक्री करण्यासाठी आपापले नंबर लावून वाट पाहत होते आणि जवळपास तीन ते चार गोदाम पूर्णत: खरेदी करून फुल्ल झाले आहेत. त्यामुळे अजून बरेच शेतकरी धानविक्रीपासून वंचित राहणार आहेत. त्यासाठी आरमोरी तालुक्‍यामध्ये धानाची खरेदी करण्यासाठी खरेदी-विक्री समितीकडे स्वतःचे गोदाम नसल्याने तसेच शासकीय गोदाम उपलब्ध न झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जवळपास तीस ट्रॅक्‍टर भरून असलेले धान उघड्यावर ठेवले आहेत. 

हेही वाचा - तेजबीरसिंग म्हणाले, आता कुठे महात्मा गांधी आणि भगतसिंग एकत्र आले

अवेळी येणाऱ्या पावसामध्ये हे धान सडत आहेत. बुधवारी जवळपास तीन वाजेपासून आरमोरी तालुक्‍यात मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आणलेले शेतकऱ्यांचे धान पूर्णत: पावसामुळे ओले झाले आहेत. परंतु अजूनपर्यंत शासनाने गोदामांची व्यवस्था न केल्याने या धान उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. 

अशा स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याच्या दृष्टीने आरमोरी परिसरात धान विक्री करिता खरेदी विक्री समितीला खरेदी करण्यासाठी तात्काळ गोदामांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट तसेच खरेदी विक्री समिती, गडचिरोलीचे अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन तहसीलदारांच्या मदतीने जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना पाठवण्यात आले आहे. 

हेही वाचा - मंत्री पुत्राच्या लग्नात पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरची भेट; युवक कॉंग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध

व्यवस्था होताच होणार खरेदी...

धान गोदाम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष महेंद्र मने यांना विचारणा केली असता आमच्याजवळ गोदाम उपलब्ध नसल्याने धान खरेदी करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. गोदामांची व्यवस्था झाल्याबरोबर आम्ही धान खरेदीला सुरुवात करू. त्यासाठी सरकारने आम्हाला गोदामांची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणीसुद्धा समितीचे अध्यक्ष महेंद्र मने यांनी केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chances of damaging grains which kept outside in Gadchiroli