चंद्रपूर : उपरवाहीत सिलिंडर स्फोट माय-लेक जखमी; सोनं खाक

सिद्धार्थ गोसावी
मंगळवार, 13 जून 2017

एक लाख रुपये व सोन जळून राख 

कंपनीत ड्युटीवर जाण्यासाठी पत्नीने चहासाठी गॅस सुरू करताच सिलिंडरनी पेट घेतला व स्फोट  झाला. नशीब बलवत्तर म्हणून सर्व कुटुंब बचावलो, असे दुरुटकर यांनी सांगितले. 

मारडा : कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या उपरवाही या गावी संजय भाऊराव दुरूटकर यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात त्यांची पत्नी ज्योती संजय दुरुटकर (वय 27) व मुलगी कोमल संजय दुरूटकर (वय 7) भाजून गंभीर जखमी झाल्या. दैव बलवत्तर असल्याने सर्व कुटुंबच बचावले आहे. स्फोट एवढा भीषण होता की, घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून सर्व साहित्य जळून राख झाले. ही दुर्घटना मंगळवारला सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, संजय भाऊराव दुरूटकर हे उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीत ठेकेदारीत लेबर म्हणून काम करतात त्यांना आठ एकर शेती आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असून त्यांनी शेतीसाठी  नातेवाइकाकडून एक लाख रुपये आणले व त्यांनी ती सर्व रक्कम घरीच ठेवली होती.

सकाळी साडेसहाच्या सुमारास घरात त्यांची पत्नी ज्योती या चहा करत होत्या. तर संजय दुरूटकर व त्यांची मुलगी घरात होते. त्यावेळी गॅस सुरू करताच सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट एवढा प्रचंड होता की, गावात बाँब फुटल्यासारखा आवाज झाल्याने अनेक ग्रामस्थांनी सांगितले. स्फोटानंतर घरास आग लागली. या दुर्घटनेत आई व मुलगी जखमी झाले. स्फोट होताच त्यानी घरातून बाहेर पळ काढला. स्फोट झाल्याने संपूर्ण घरास आग लागली. स्फोट इतका भीषण होता की घराचे छप्पर उडाले. व भिंतीला तडा गेला. तसेच त्यानी शेतीसाठी आणलेले 1 लाख रुपये व सोन्याच्या दोन अंगठी गोप, पोत कानातले डुल व घरातील साहित्य, धान्य, मौल्यवान वस्तू, व्यवसायासाठी आणलेले साहित्य तसेच संसारातील सर्व जीवन उपयोगी वस्तू जळून अक्षरश:कोळसा झाले.त्यामुळे घरातून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत होते. याची सूचना सागर बल्की यांनी अंबुजा कंपनीच्या अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांच्या वाहनांसह घटनास्थळी पोचले व आगीवर नियंत्रण मिळवले तोपर्यंत एक लाख रुपये सोन व सर्व संसार उपयोगी साहित्य जळून राख झाले होते.

त्यांना उपचारासाठी अबुजा कंपनीतील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जखमींना शासकीय मदत व नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: chandrapur news vidarbha news cylinder blast two injured