चंद्रपूर झाले आता स्वच्छपूर! मिळाले "थ्री स्टार" मानांकन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातर्फे स्वच्छ शहरांना दिल्या जाणाऱ्या मानांकनामध्ये चंद्रपूर शहराने तीन तारांकित मानांकन (थ्री स्टार रेटिंग) प्राप्त केले असून, असा मान प्राप्त करणारी चंद्रपूर शहर महानगरपालिका ही विदर्भातील पहिलीच महापालिका आहे.

चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पडताळणी करण्यात आलेल्या देशभरातील कचरामुक्त तारांकित शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातर्फे स्वच्छ शहरांना दिल्या जाणाऱ्या मानांकनामध्ये चंद्रपूर शहराने तीन तारांकित मानांकन (थ्री स्टार रेटिंग) प्राप्त केले असून, असा मान प्राप्त करणारी चंद्रपूर शहर महानगरपालिका ही विदर्भातील पहिलीच महापालिका आहे.
केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन स्पर्धेत देशातील 1 हजार 435 शहरांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या मानांकनांची घोषणा केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहारमंत्री हरदीप पुरी यांनी जाहीर केली आहे. चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, ठाणे आणि मीरा-भाईंदर यासह महाराष्ट्रातील 34 शहरांना तीन स्टार रेटिंग देण्यात आले आहे. इंदूर, म्हैसूर, अंबिकापूर, सूरत, राजकोट, नवी मुंबई या सहा शहरांना पंचतारांकित, तर अहमदनगर, अकोला, नाशिक, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली यांना एक स्टार रेटिंग देण्यात आले आहे.
लहान, मोठ्या शहरांना अधिक राहाण्यायोग्य बनविणे व स्वच्छतेबाबत उच्च मानांकन प्राप्त करण्यास त्यांच्यात निकोप स्पर्धा व्हावी, या दृष्टीने नगर विकास मंत्रालयाने जानेवारी 2018 मध्ये स्टार रेटिंग प्रोटोकॉल सुरू केले. यातील कडक निकषांनुसार केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेची शहरनिहाय तपासणी केली. ही प्रणाली कार्यक्षम आहे की नाही हे समजण्यास शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता दोन वेगवेगळ्या मापदंडांवर प्रत्येक शहराला गुण देण्यात आले. या स्टार रेटिंगसाठी देशातील 1 हजार 435 शहरांनी आवेदने केली होती. यातील 698 शहरांची निवड झाल्यानंतर 141 शहरांना स्टार रेटिंग देण्यात आले आहे. सदर रेटिंग प्रक्रियेत देशाच्या विविध शहरांतील 1.19 कोटीपेक्षा अधिक नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. तर, 10 लाखांहून अधिक छायाचित्रांची मदत घेण्यात आली होती. या मानांकनाबद्दल महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी शहरातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

सविस्तर वाचा - कोरोना तपासणीत हयगयीला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाची विचारणा
सर्वांचेच प्रयत्न
केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाकडून प्राप्त मानांकनाचे श्रेय चंद्रपूरकरांना जाते. मनपा पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व स्वच्छता राखणारे कामगार यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे साध्य करता आले आहे.
 राजेश माहिते,
आयुक्त, मनपा, चंद्रपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrapur is now three star clean city