केंद्र सरकारने नवीन कृषीकायदे रद्द करावे

रुपेश खैरी
Friday, 15 January 2021

केंद्र सरकारने हे कायदे रद्द करावे, असे मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी येथे व्यक्‍त केले.

वर्धा : नवीन कृषीविधेयकांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ज्यांच्याकरिता हे कायदे बनत आहे, त्यांनाच हा कायदा मान्य नसल्याने मागे घ्यावा. धनदांडग्यांच्या हिताकरिता हे कायदे आहेत. केंद्र सरकारने उद्योग, रेल्वे, विमानतळ विकण्याचा सपाटा लावला आहे. आता शेतकऱ्यांच्या जमिनीवर लक्ष आहे. याची शेतकऱ्यांना जाणीव झाली आहे. केंद्र सरकारने हे कायदे रद्द करावे, असे मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी येथे व्यक्‍त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री बघेल यांनी सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आश्रम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्रमाची माहिती घेतली. यानंतर बापूकुटीत प्रार्थना केली. ते पुढे म्हणाले, गांधीजींनी सांगितलेला मार्ग जगाकरिता व आपल्याकरिता आहे. लोक हिंसेला उबगले आहे. हळूहळू नक्षलवाद कमी होत आहे. छत्तीसगडमध्ये मागील सरकारने लोकांचा विश्‍वास गमवला होता. आम्ही जनतेचा विश्‍वास जिंकण्याकरिता काम करीत आहोत. रासायनिक शेतीमुळे विविध आजार होत आहे. त्यामुळे जैविक शेती काळाची गरज आहे. आम्ही गावे स्वावलंबी होण्याकडे वाटचाल करीत आहोत. महात्मा गांधींना प्रेरित कार्यक्रम छत्तीसगड राज्यातही राबवीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhattisgarh Chief Minister Bhupendra Baghel has said that the central government should repeal the new agricultural laws