हे काय? मुख्यमंत्र्यांचाच मतदारसंघ मतदानात शेवटून पहिला

अनंत कोळमकर
Tuesday, 22 October 2019

माओवाद्यांच्या सतत दहशतीत राहणाऱ्या व आदिवासीबहुल अशा गडचिरोली जिल्ह्याने या टक्केवारीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्ह्यात 67.17 टक्के मतदान झाले.

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी झालेल्या मतदानाचे अंतिम आकडे जाहीर झाले असून विदर्भाने 60 टक्‍क्‍यांचा आकडा ओलांडून प्रथम श्रेणी मिळवली आहे. विदर्भात 11 जिल्ह्यांमधील 62 मतदारसंघांत एकूण 62.96 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या मतदारसंघातून लढत होते, तो दक्षिण-पश्‍चिम नागपूर मतदारसंघ मतदानाच्या टक्केवारीत विदर्भात सर्वांत शेवटी राहिला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात सर्वाधिक 74.63 टक्के झाले.
माओवाद्यांचा एकूणच निवडणुकीला विरोध असतो. या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ नका, मतदान करू नका, अशा धमक्‍या ते देत असतात. या माओवाद्यांच्या सतत दहशतीत राहणाऱ्या व आदिवासीबहुल अशा गडचिरोली जिल्ह्याने या टक्केवारीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्ह्यात 67.17 टक्के मतदान झाले. सर्वात शेवटी राहिलेल्या नागपूर जिल्ह्याची लाज जिल्ह्याच्या ग्रामीण भागाने काहीशी राखली. जिल्ह्यातील सर्व 12 मतदारसंघ धरून एकूण 57.19 टक्के मतदान झाले. त्यात नागपूर महानगराचा वाटा फक्त 50.63 टक्के आहे. तर उर्वरित ग्रामीण भागात 64.51 टक्के मतदान झाल्याने जिल्ह्याची एकूण टक्केवारी 57.19पर्यंत पोहोचली. नागपूरपेक्षा थोडी अधिक प्रगती अकोला जिल्ह्याने केली. या जिल्ह्यात 57.80 टक्के मतदान झाले. अन्य 9 जिल्ह्यांनी 60 टक्‍क्‍यांचा आकडा ओलांडला.

विदर्भ एकूण टक्केवारी - 62.96
पश्‍चिम विदर्भ (पाच जिल्हे, 30 मतदारसंघ) - 62.21 टक्के
पूर्व विदर्भ (सहा जिल्हे, 32 मतदारसंघ) - 63.58 टक्के


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Chief Minister's constituency recorded lowest voting percentage