esakal | कॉफी विथ महाराष्ट्र ! हे माहितीये का? आहो महाराष्ट्रातही आहेत काॅफीचे मळे, 'या' गावात होतं कॉफीचं उत्पादन
sakal

बोलून बातमी शोधा

coffee

अमरावती जिल्ह्यापासून ८० किमी अंतरावर चिखलदरा हे गाव आहे. हे समुद्रसपाटीपासून ३,५६४ फुट उंचीवर सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड असते. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलद-याच्या कॉफीची चटक अनेकांना लागलेली आहे.

कॉफी विथ महाराष्ट्र ! हे माहितीये का? आहो महाराष्ट्रातही आहेत काॅफीचे मळे, 'या' गावात होतं कॉफीचं उत्पादन

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : सध्या पावसाळा सुरु आहे. पाऊस म्हणलं तर गरमागरम चहा किंवा फेसाळलेली कडक कॉफी आणि गरमा गरम भजी खायला कुणाला आवडणार नाही, बरोबर ना...धावपळीच्या दिवसात अनेकजण फ्रेश राहण्यासाठी कॉफी प्यायला जास्त प्राधान्य देतात. पण त्या कॉफीबद्दल तुम्हाला सविस्तर काही गोष्टी माहित आहेत का. त्याच कॉफीची शेती पाहायची असेल तर काही लोक आसाम, केरळला भेट देण्यासाठी जातात, पण महाराष्ट्रातल्या पर्यटकांना बाहेर ठिकाणी कुठेही जायची गरज पडणार नाही. कारण आता त्याच कॉफीचे उत्पादन महाराष्ट्रात एकाच ठिकाणी होते असलेले पाहायला मिळेल ते म्हणजे चिखलदरा...

अमरावती जिल्ह्यापासून ८० किमी अंतरावर चिखलदरा हे गाव आहे. हे समुद्रसपाटीपासून ३,५६४ फुट उंचीवर सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड असते. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलद-याच्या कॉफीची चटक अनेकांना लागलेली आहे. चिखलदऱ्यामध्ये कॉफीचा हंगाम फेब्रुवारी - मार्च या महिन्यात असतो. जून ते मार्च असे दहा महिने कॉफीचे पीक असते. फेब्रुवारी महिन्यात कॉफी काढतात. येथील कॉफीचे दर कधीही पडले नाहीत. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम वातावरणावर झाला असून चिखलदऱ्याचे तापमान वाढत असल्याने त्याचा परिणाम कॉफीच्या उत्पन्नावर झाला आहे. 

चिखलदरा येथील आल्हाददायक वातावरणात तयार होणारी कॉफी अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. चिखलद-यात येणारे पर्यटकदेखील या कॉफीच्या बागेने आकर्षित होतात व या कॉफीची चव घेऊन वारंवार त्याची मागणी करतात. चिखलद-याच्या परिसरातदेखील अशा स्वरूपाच्या बागा फुलविण्यात आल्या तर त्याचा लाभ निश्चितपणे आदिवासींना होऊ शकतो. लवादा, आलाडोह, शहापूर, मोथा, खटकाली, आमझरी, टेटू आदी ठिकाणी मोकळ्या जागेत कॉफीची लागवड केली तर येथील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. परंतु शासनाचे उदासीन धोरण तसेच लोकप्रतिनिधीदेखील चिखलद-याच्या नंदनवनाच्या विकासात भर घालण्यात डोळेझाक करीत असल्याचा आरोप वारंवार होतो. 

महाराष्ट्रात एकमेव फक्त चिखलद-यातच कॉफीची बाग आहे. या कॉफीच्या बागेच्या जोरावर येथील रोजगार वाढू शकतो व स्थलांतराचे प्रमाण कमी झाल्यास कुपोषणावरदेखील काही प्रमाणात मात करता येऊ शकते. कॉफीच्या बागेमुळे प्रदूषण दूर करण्यातदेखील मदत होणार आहे. यासोबतच राज्यात कुठेही कॉफीचे मळे नसल्याने चिखलद-याच्या वैभवात अधिकच भर पडेल व पर्यटकांची संख्यादेखील वाढेल.

म्हणून चिखलदरा निवडले...
 
चिखलदऱ्यामध्ये १८२० वेळी इंग्रजांनी कॉफीच्या बागांची लागवड केली. युरोपसारखे वातावरण चिखलदऱ्याचे असल्याने आणि येथील तापमान फारच कमी असल्याने चिखलदरा हे गाव निवडले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फक्त याठिकाणी कॉफीची लागवड केली जाते. 

कॉफीला कीड लागली तर असे केले जाते...
 
चिखलदऱ्यामध्ये कॉफीची लागवड करताना कॉफीला कीड लागली तर नैसर्गिकरित्या फवारणी करून कॉफीवरील कीड काढली जाते. 

यांनी लावली कॉफीची बाग...

ब्रिटिशांच्या काळात इंग्रज अधिकारी रॉबिन्स याने चिखलद-यात ५० हेक्टर क्षेत्रात लावलेली कॉफीची बाग आजदेखील जशीच्या तशीच आहे. यापासून प्रेरणा घेण्याचे औचित्य मात्र मेळघाटवासींयाना साधले नाही. त्यामुळे ते विविध समस्यांच्या खाईत लोटल्या जात असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे इंग्रजांनी लावलेल्या कॉफीच्या या बागेवर आदिवासी युवक व बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. मात्र या बागांची व्याप्ती वाढवून राजाश्रय मिळाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो.

चिखलदऱ्यामध्ये ही कॉफी आहे...
 

कॉफीचे दोन प्रकार आहे. अरबीका आणि राॅबस्टाॅ दोन प्रजाती आहेत. चिखलदऱ्यामध्ये अरबीका कॉफीची लागवड केली जाते. ही कॉफी पिण्याने पचनक्रिया सुधारते आणि ही कॉफी पिल्याने वजन कमी होते. 

कॉफीच्या बागेचे क्षेत्रफळ... 

पत्रकार नारायण येवले म्हणाले, महाराष्ट्रात एकमेव फक्त चिखलद-यातच कॉफीची बाग आहे. ही बाग ५० हेक्टर क्षेत्रात इंग्रजांनी लावली होती. तेव्हापासून आजपर्यंत ती जशीच्या तशी आहे. आजपर्यंत या बागेचा विकास किंवा त्यात वाढ करण्यात आली नाही. परंतु आता या बागेला राजाश्रय मिळावा व बागेचे क्षेत्रफळ वाढवावे, अशी मागणी होत आहे. येथील वातावरण हे कॉफीच्या बागेसाठी पोषक असल्याने याठिकाणी कॉफीच्या बागा फुलविणे फार गरजेचे आहे. चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून, याठिकाणी संपूर्ण देशातून पर्यटकांची रेलचेल असते. या पर्यटकांच्या माध्यमातून कॉफीला बाजारपेठ मिळेल व स्थानिकांना रोजगारही मिळेल. त्यामुळे या बागांना वाढविण्याची गरज आहे.

फादर सायमन्स म्हणाले, चिखदऱ्यामध्ये १८२० मध्ये कॉफीची लागवड इंग्रजांनी केली. १०० एकरात ही १२० वर्षे जुनी बाग आहे. वार्षिक उत्पन्न २०-२५ क्विंटल उत्पन्न दरवर्षी मिळते. आम्ही कॉफी पावडर बनवून स्थानिक व्यापाऱ्यांना विकतो. तसेच मुंबई व बेंगलोर येते निर्यात करतो. ३०० रु किलोप्रमाणे बिया व ५०० रु. किलोप्रमाणे पावडर विकतो. कॉफीची झाडे ही सावलीमध्ये वाढतात. सध्या झाडाची कटाई होत असल्याने झाडी कमी झाली आहेत.
 
चिखलदरा येथील नगराध्यक्षा विजया सोमवंशी म्हणाल्या, चिखलदरा येथील कॉफी ही ब्रिटिशकालीन आहे. महाराष्ट्र शासनाने या कॉफीच्या बागा वाढविण्यासाठी मदत करावी. चिखलदरा नगरपरिषदेला महाराष्ट्र शासनाने मदत करावी. तसेच नगर परिषद चिखलदरातर्फे सुद्धा कॉफी लागवडीसाठी आणि कॉफीच्या बागांना प्रोत्साहन देण्यासाठी नगर पालिका स्तरावर प्रयत्न केले जातील.