esakal | वादळानं पाळण्यातील बाळ १०० फूट उंच उडालं, आईनं फोडला एकच हंबरडा

बोलून बातमी शोधा

manthan

वादळानं पाळण्यातील बाळ १०० फूट उंच उडालं, आईनं फोडला एकच हंबरडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आर्णी (जि. यवतमाळ) : वादळाच्या तडाख्यात घराच्या टिनपत्रासह लोखंडी रॉडला बांधून असलेला पाळणा हवेत उडाल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारी ही घटना शनिवारी (ता.एक) दुपारी बारा वाजताच्या सुमारास लोणी येथे घडली.

हेही वाचा: उपराजधानीत भडकले गॅंगवॉर; भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी महिलेसह दोघांवर तलवारीने हल्ला

मंथन सुनील राऊत असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. वादळात घराच्या छप्परासोबतच लोखंडी रॉडला बांधलेला पाळणा आणि त्यात झोपलेले बाळ जवळपास शंभर फूट उंच आकाशात उडाले. अवघ्या काही वेळात खाली जमिनीवर कोसळलेल्या मंथनला काळाने हिरावून घेतले. अचानक घडलेली ही घटना लहान दिव्या बघत होती. पाळणा उडताच 'बाबू हवेत उडाला' अशी जोरात किंचाळी तिने फोडली. समोरचे दृश्‍य बघून आई अरुणानेही हंबरडा फोडला. निःशब्द झालेल्या सुनील राऊत यांच्या मदतीला धावून आलेल्या शेजाऱ्यांचाही थरकाप उडाला होता. त्यांनी थरथरत्या हातांनी गंभीर अवस्थेतील मंथनला उपचारासाठी यवतमाळला नेले. मात्र, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

पंधरा दिवसांपूर्वीच केला होता गृहप्रवेश -

मंडप डेकोरेशनचे व्यावसायिक असणारे सुनील राऊत यांनी पंधरा दिवसांपूर्वी नवीन घरात गृहप्रवेश केला. त्यामुळे आनंदाचे वातावरण होते. चिमुकल्याच्या आवाजाने घरातील वातावरण अगदी प्रसन्न होवून जात होते. मात्र, काळाने घात केला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.