फादर दिब्रिटो यांची निवड अडकली धार्मिक रंगात

फादर दिब्रिटो यांची निवड अडकली धार्मिक रंगात
नागपूर : उस्मानाबादेतील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली अन्‌ "नेटकऱ्यांनी' निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाला आता धार्मिक रंग प्राप्त झाला असून, हे साहित्यप्रेम नसून धर्मपरिप्रसार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. ज्येष्ठ साहित्यिकांनी ही बाब गैर असल्याचे म्हटले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील साहित्य परिषदांच्या बैठकीत फादर दिब्रिटो यांची निवड जाहीर झाली. मात्र, हा निर्णय सोशल मीडियावर प्रचंड "ट्रोल' होतो आहे. अनेकांनी हा धर्मप्रसार असल्याची आगपाखड करत फादर दिब्रिटो यांचे लिखाण "बायबल, धर्मपरिवर्तन अन्‌ ख्रिस्तभूमीची संघर्षयात्रा' एवढेच मर्यादित असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर काहींनी तर धर्मांतरणाचे वारे वाहतील, विद्येची देवता बदलेल अशाही पोस्ट व्हायरल केल्या आहेत. एका शहाण्या नेटकऱ्याने, साहित्य मंडळाच्या तमाम सदस्यांचा सरकारी खर्चाने बाप्तिस्मा करावा अशीही मागणी केली आहे.
वास्तविक बघता संमेलनाध्यक्षाची निवड करताना धर्म नव्हे तर माणसाचे लिखाण बघितले जाते. यापूर्वीही यु. म. पठाण यांच्यासारखे मुस्लिम परंतु वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक संमेलनांचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या विशिष्ट चौकटीत पाहणे चुकीचे ठरणार आहे. मराठी भाषा राज्यातील अन्यधर्मीय लोक उत्कृष्ट बोलतात. त्यामुळे एखाद्या ख्रिश्‍चन धर्माचे पालन करणाऱ्या लेखकाचा विरोध करणे चुकीचे ठरेल अशाही प्रतिक्रीया साहित्यविश्‍वात उमटत आहेत.
कोण आहेत फादर दिब्रिटो ?
फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. "सुवार्ता' मासिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनात्मक लेखन केले. "सुबोध बायबल-नवा करार' या ग्रंथासाठी दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी मराठी ख्रिती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. दिब्रिटो यांचे "संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची', "आनंदाचे अंतरंग', "तेजाची पाऊले', "परिवर्तनासाठी धर्म', "ओऍसिसच्या शोधात', "सृजनाचा मळा', "नाही मी एकला', "सृजनाचा मोहोर', "गोतावळा' आदी ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

निवडीने त्यांच्या कार्याचा सन्मान
फादर दिब्रिटो समाजकार्य करणारे व्यक्‍ती आहेत. गोरगरिबांसाठी झटणारे आहेत. लोकांचे दु:ख त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले आहे. धर्मप्रसाराच्या नजरेतून त्यांना पाहणे योग्य नाही. ही निवड म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान आहे असे मी समजते.
-डॉ. जुल्फी शेख, निवृत्त प्राचार्य.

धर्मप्रसार, संमेलनाचे व्यासपीठ वेगळे
फादर दिब्रिटो यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणे ऐतिहासिक घटना आहे. त्यांनी निर्माण केलेले साहित्य चांगले असून, जात, पंथ, धर्माचा विचार न करता त्यांनी भाषेची सेवा केली आहे. साहित्यप्रेमींचा आक्षेप ते धर्मप्रसारक असण्यावर असेल, त्यांनी तो विषय संमेलनाच्या व्यासपीठावर आणू नये, असे मला वाटते. यापूर्वीही वेगवेगळ्या आग्रहपूर्वक धार्मिक विचारांची मांडणी करणाऱ्यांची निवड अध्यक्षपदी झाली आहे हे लोकांनी लक्षात ठेवावे.
- डॉ. वि. स. जोग, ज्येष्ठ साहित्यिक

आमचा लोकशाही मार्गाने निषेध
सर्वसमावेशक असणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कट्टर वृत्तीच्या व्यक्तीला बसवणे, हा साहित्य महामंडळाचा आचरटपणा आहे. पु. भा. भावे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर, याच तथाकथित पुरोगामींनी ते संमेलन गुंडगिरीने उधळून लावले होते. तसे आम्ही करणार नाही. मात्र, लोकशाही मार्गाने निषेध नक्की करतो.
- अनिल शेंडे, ज्येष्ठ कवी

निवड पद्धती चुकीची
गेल्या वर्षीपासून सुरू झालेली निवड पद्धत पूर्णत: चूक आहे. या पद्धतीने अशाच निवडी होणार हे निश्‍चित. निवडणूक पद्धतीत मतदारांचा आदर होतो. आता जर दिब्रिटो यांचे योगदान निवड समितीला वाटत असेल तर, त्यांचा सन्मान केला जावा. त्यांना सन्मानाने वागणूक देणे, हे कर्तव्य आहे.
- मदन कुळकर्णी, ज्येष्ठ समीक्षक

यथोचित सन्मान
फादर दिब्रिटो धर्मोपदेशक असले तरी त्यांनी ख्रिस्ती साहित्याची निर्मिती केली आहे. ते समाजसुधारक व पर्यावरणाचे रक्षणकर्तेसुद्धा आहेत. अलीकडे त्यांना पुण्याच्या विद्या प्रतिष्ठानने जीवन गौरव पुरस्कार बहाल केला आहे. कॅथेलिक पंथीय नियतकालिकाचे संपादक असताना त्यांनी त्याल धार्मिक स्वरूपाचे लेबल लागू दिले नाही. उलट मराठी लेखकांना मराठी साहित्याचे दालन खुले करून दिले. संमेलनाचे अध्यक्ष करून फादर यांचा यथोचित सन्मानच करण्यात आला आहे.
-प्राचार्य डॉ. सुभाष पाटील, एकोणविसाव्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com