वर्धा कारागृहात दोन कैद्यांत हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Clash between two prisoners in Wardha Jail one injured nagpur

वर्धा कारागृहात दोन कैद्यांत हाणामारी

वर्धा : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एका क्षुल्लक कारणावरून दोन कैद्यात हाणामारी झाली. त्यात एका कैद्याने दुसऱ्यावर दुपट्ट्यात दगड बांधून हल्ला चढवून जखमी केले. ही घटना कारागृहातील बरॅक क्रमांक आठमध्ये गुरुवारी (ता. १५ सप्टें.) रात्री घडली. या घटनेमुळे कारागृहातील इतर कैद्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जखमी कैद्याचे नाव कपिल नंदकिशोर आखाडे (वय २६) असे असून तो मारोती वॉर्ड, हिंगणघाट येथील रहिवासी आहे. तो सध्या एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. हल्लेखोर कैद्याचे नाव शेख तौफिक शेख शाकीर असे असून त्याला पोस्को कायद्यान्वये १ वर्षांची शिक्षा झाली आहे. दोघेही जिल्हा कारागृहातील बरॅक क्रमांक आठमध्ये होते.

बुधवारी (ता. १४) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शेख तौफिक हा बरॅकमध्ये कपिलच्या बिछान्यावर बसला होता. दरम्यान तेथून जात असताना कपिलचा धक्का तौफिकला लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. काल गुरुवारी कपिल बरॅकमध्ये असताना तौफिकने बुधवारी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका दुपट्ट्यात छोटे छोटे दगड बांधले व त्याची पोटली तयार करून कपिलवर अचानक हल्ला चढविला. या मारहाणीत कपिल जखमी झाला. त्याच्यावर कारागृह रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्काळ उपचार करून त्याच्या जखमेवर तीन टाके दिल्याची माहिती आहे.

या घटनेने इतर कैद्यांसह कारागृह प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. याप्रकरणी कार्यालयीन कर्मचारी यशवंत वरखडे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी तौफिकविरुद्ध मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

महिनाभराने सुटणार होता तौफिक

शेख तौफिक शेख शाकीर याला पोस्को कायद्यान्वये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती. ती शिक्षा तो भोगत आहे. महिनाभराने त्याची शिक्षा संपणार होती व तो कारागृहातून सुटणार होता. मात्र, आता कैद्याला मारहाण करण्याच्या घटनेमुळे त्याची शिक्षा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Clash Between Two Prisoners In Wardha Jail One Injured Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..