गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात भरविणार वर्ग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नांद (जि.नागपूर) :  वारंवार शिक्षकाची मागणी करूनही गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. या विरोधात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात येत्या मंगळवारी वर्ग भरविण्याचा निर्णय पिरवावासींनी घेतला आहे. 

नांद (जि.नागपूर) :  वारंवार शिक्षकाची मागणी करूनही गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. या विरोधात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात येत्या मंगळवारी वर्ग भरविण्याचा निर्णय पिरवावासींनी घेतला आहे. 
भिवापूर तालुक्‍यातील पिरावा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा असून या शाळेत 1 ते 8 वर्ग आहेत. पटसंख्या 65 इतकी आहेत. येथे तीन शिक्षकांची नियुक्ती होती. पण, एक शिक्षक एम. डी. ठाकरे हे मागील एप्रिल महिन्यात सेवानिवृत्त झाले. त्यानंतर दोनच शिक्षक शाळेत कार्यरत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त भार पडतो. विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही. येथील पालकांनी नेहमीप्रमाणे तिसरा शिक्षक मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनातून मागणी केली. पण, या मागणीला केराची टोपली दाखवित अधिकाऱ्यांनी फक्त आश्वसनेच दिली. रिक्त जागा अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. रिक्त जागेवर शिक्षक न दिल्याने विद्यार्थी व पालकांनी 13 सप्टेंबरला शाळेला कुलूप ठोकले होते. केंद्रप्रमुख श्रीराम वाघे यांनी भेट देऊन पालकांना एक महिन्यात शिक्षक देण्याचे आश्‍वासन दिले. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. काहींनी मध्यस्थी करून गुरुवारपर्यंत शिक्षक द्यावा, अशी मागणी केली. त्यानंतर शनिवारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातच बसविले. याबाबत " दै.सकाळ'मध्ये 16 सप्टेंबरला "झेडपी शाळेला ठोकले कुलूप' या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर केंद्रप्रमुखांनी गुरुवारी शिक्षकांची नियुक्ती करून देतो, असे आश्वासन दिले. ते गावकऱ्यांनी मान्य करून शाळेचे कुलूप उघडे करून शाळा सुरू केली. शुक्रवार व शनिवारपर्यंत शिक्षकांची नियुक्ती झाली नाही. म्हणून परत गावकऱ्यांनी केंद्रप्रमुख श्रीराम वाघे यांना शनिवारी फोन करून आश्‍वासनाबद्दल काय झाले, अशी विचारणा केली. गटशिक्षणाधिकाऱ्यांची ऑर्डरवर सही झाली नाही, असे कारण सांगून केंद्रप्रमुख वाघे यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावकऱ्यांनी  टशिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून याबाबत माहिती विचारली. आता निवडणुकांचा काळ असल्याने बैठकी "अटेंड' करण्यात बिझी असल्याचे उत्तर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळाले. तुम्ही सीईओ साहेबांकडे जाऊ शकता, असेही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सुचविले. केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून वारंवार अशी टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने त्रस्त होऊन मंगळवारी भिवापूर येथे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवायची, असा निर्णय घेतला.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Classroom to be provided in group education officers' rooms