अन्न व औषध विभागाची खाद्य उत्पादकांवर करडी नजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नागपूर ः विविध सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न पदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांच्या तपसणीची मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत 279 ठिकाणी कारवाई करीत अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यातील 114 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

नागपूर ः विविध सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्न पदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांच्या तपसणीची मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत 279 ठिकाणी कारवाई करीत अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यातील 114 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
मोहिमेअंतर्गत खवा, मावा, बर्फी, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप, सुपारी, गुटखा आदी अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. नागपूर विभागात खवा, मावा आणि मिठाई, गुटखा आणि इतर खाद्यान्नाचे 279 नमुने विश्‍लेषणासाठी घेण्यात आले. त्यापैकी 16 ठिकाणी कमी दर्जाचे आढळून आले आहेत. तीन ठिकाणी भेसळयुक्त, 30 ठिकाणी असुरक्षित नमुने सापडले. 279 पैकी 114 नमुन्यांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. यातील तीन प्रकरणांचा निर्वाळा झाला असून 55 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पाच तडजोड प्रकरणात 22 हजारांचा दंड गोळा करण्यात आला आहे.
या कालावधीत अन्न व औषधी प्रशासनाने खाद्यान्न वगळता इतर साहित्यांची जप्ती केली. नागपूर शहरात सहा आणि नागपूर ग्रामीणमध्ये एक अशा एकूण सात कारवाया केल्या. त्यात 10 हजार 429 किलो साठा जप्त केला. त्याची किंमत 13 लाख सहा हजार 407 रुपये आहे. नागपूर शहरातील साठा 12 लाख 77 हजार 247 किमतीचा आहे. प्रतिबंधित अन्न पदार्थांवर सर्वाधिक गडचिरोली जिल्ह्यात आठ कारवाया करण्यात आल्या. त्यात 124 किलो साठा जप्त केला. त्याची किंमत 50 लाख 87 हजार 252 रुपये आहे. नागपूर ग्रामीणमध्ये सहा कारवाया केल्या. नागपूर विभागात 555 ठिकाणी तपासण्या केल्या. त्यात 118 व्यापाऱ्यांना सुधारण्याच्या नोटीस बजावल्या. 16 व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केले आहे. 27 प्रकरणात तडजोड करून त्यांच्याकडून 72 हजार 800 रुपयाचा दंड वसूल केला आहे.
सणासुदींच्या काळात माव्यापासून तयार केलेली मिठाई 24 तासांच्या आत तर बंगाली व तत्सम मिठाई 8 ते 10 तासाच्या आत सेवन करावी. खराब मिठाई नष्ट करावी. तेल-तूप खरेदी करताना त्यावरील दिनांक पाहूनच खरेदी करावे. अन्नपदार्थ खरेदी करताना काही शंका असल्यास सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना कळवावे.
- शशिकांत केंकरे, सहआयुक्त अन्न व औषधी प्रशासन विभाग, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A closer look at the food manufacturers of the food and medicine department