पावसाळ्यात ढगांचे पांघरूण ; पर्यटकांना खुणावत आहे जोडामेट्टा डोंगर

गडचिरोली : जोडामेट्टा डोंगरावरून दिसणारे विहंगम दृश्‍य.
गडचिरोली : जोडामेट्टा डोंगरावरून दिसणारे विहंगम दृश्‍य.

गडचिरोली  : निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य स्थळे असली, तरी काहीशा अनवट वाटेवरील सिंसूर गावालगतचे जोडामेट्टा हे डोंगर विलक्षण आहे. सध्या पावसाळ्यात या डोंगरावरील रान हिरवेकंच झाले असून त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारे खळाळणारे निर्झर पर्यटकांना खुणावत आहेत.
जोडामेट्टा हे एक डोंगर नसून दोन जुळे डोंगर आहेत. गोंडी भाषेत जोडा म्हणजे दोन किंवा जुळे आणि मेट्टा म्हणजे डोंगर म्हणून या दोन जुळ्या डोंगरांना जोडामेट्टा म्हणतात. येथे पोहोचायला धानोरा तालुक्‍यातील रांगीपासून काही अंतरावर कन्हाळगाव, महावाडा पार करून चिंगली फाट्याजवळून डाव्या हातावर वळून पुढे डांबरी रस्त्याने जावे लागते. काही अंतर पार केल्यावर उजवीकडे एक कच्चा रस्ता लागतो. या कच्च्या रस्त्याने साधरण अर्धा किमी अंतर पुढे जाताच आपण सिंसूर या गावात पोहोचतो. या गावाच्या मागे धानाची काही शेते असून शेतालगतच जोडामेट्टा डोंगर आहे. या डोंगरापर्यंत पोहोचायला घनदाट रानातून चांगली एक, दीड किमीची पायवाट तुडवावी लागते. पावसाळ्यात येथे घनगर्द वृक्ष आणि जमिनीवरही हिरव्या झुडपांचा गालिचा अंथरलेला असतो. मध्ये-मध्ये जंगलातील ओहोळ लागतात.

पण, ते फार खोल नसून सहज पार करता येतात. जोडे घालून असाल, तर तुमच्या जोड्यांना स्नान घातल्याशिवाय अर्थात बुडवल्याशिवाय हे ओहोळ तुम्हाला पुढे जाऊ देणार नाहीत. साग, मोह, बिजा, धावडा, ऐन, हलदू, कळंब, करू, तिवस, आवळा, गराडी, लोखंडी, अर्जुन अशा अनेक वृक्षांनी भरगच्च असलेल्या या रानात बांबूच्या मोठ्या रांजी आहेत. काही ठिकाणी, तर आपण बांबूबनातूनच जात असल्यासारखे वाटते. पुढे चढ सुरू झाल्यावर खरा दम लागतो. पण, पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण, सावली धरून असलेले वृक्ष आणि डोंगरातून वाहणाऱ्या ओहोळांचा मधुर ध्वनी यामुळे हा डोंगर चढताना थकवा क्षणात नाहीसा होतो. काही ठिकाणी चढाव जरा कठीण असला, तरी ट्रेकिंगची, गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांसाठी हा आव्हानात्मक भाग अधिक आनंद देणारा आहे. या डोंगराच्या माथ्यावर गेले की, पुढील दृश्‍य बघून श्रमाचं साफल्य म्हणजे काय याचा प्रत्यय येतो. या पहाडावरून इतर अनेक पहाडांचा पसारा दिसतो. हिरव्यागार डोंगरातून वाहणारी नदी, कुठे चिमुकली शेते, घरे, दूर दूरपर्यंत हिरव्यागार लाटांसारखे दिसणारे हिरवे डोंगर आणि हिरवे जंगल बघून मन तृप्त होते. सिंसूर या गावाला वनहक्‍क प्राप्त असून येथील निसर्ग त्यांनी मेहनतीने राखला आहे. त्यामुळे कधीतरी वाट वाकडी करून पर्यटकांनी या अस्पर्श जंगलाला आणि हिरव्यागर्द डोंगराला भेट द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

आज मै उपर, आँसमा निचे....
हा डोंगर प्रचंड उंच आहे. पावसाळ्यात या डोंगराला दुरून बघितल्यास ओथंबलेल्या ढगांना पांघरूण उभा असलेला दिसतो. कित्येकदा पावसाच्या पाण्याने जड झालेले ढग डोंगरमाथ्याच्या खाली असतात. त्यामुळे डोंगर चढताना मध्येच ढग आपल्याला गाठतात. अनेकदा आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो तेव्हा ढग खाली आणि आपण वर अशी स्थिती असल्याने ‘आज मै उपर, आँसमा निचे’ हे गाणं हक्‍काने गुणगुणता येते. आपण डोंगरमाथ्यावर, आपल्या पायांखाली पाणी भरलेले ढग आणि त्याखाली जंगलात कोसळणाऱ्या जलधारा,असा विलक्षण अद्‌भुत अनुभवही येथे घ्यायला मिळतो.

-संपादन ः चंद्रशेखर महाजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com