अपयशाच्या भीतीने राहुल गांधी बॅंकॉकला

अपयशाच्या भीतीने राहुल गांधी बॅंकॉकला

नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. 
शहरातील पश्‍चिम नागपूर, दक्षिण नागपूर तसेच दक्षिण-पश्‍चिम नागपूर मतदार संघातील आयोजित वेगवेगळ्या प्रचारसभेत त्यांनी विरोधकांवर हतबल झाल्याचा आरोप केला तर नागपूरच्या विकासावरही भाष्य करीत त्यांनी जिल्ह्यातील बाराही उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले. दक्षिण-पश्‍चिम मतदार संघातील सरदार पटेल चौक, टिंबर मार्केट येथे आयोजित प्रचारसभेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव, बरिएमंच्या ऍड. सुलेखा कुंभारे, रिपाइंचे (आठवले) भूपेश थूलकर, अविनाश ठाकरे, मुन्ना यादव, अर्चना डेहनकर, प्रमोद चिखले यांच्यासह नगरसेवक व मनपातील तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या पाच वर्षात स्वच्छ प्रतिमेसह नागपूर, विदर्भात जी कामे केली, ती केवळ दक्षिण-पश्‍चिममधील नागरिकांच्या आशीर्वादामुळेच शक्‍य झाल्याचे ते म्हणाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांकडे नेतेच नसल्याचे नमूद करीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीदही दुःख व्यक्त करीत असल्याने कॉंग्रेस पक्ष नैराश्‍यात दिसून येत असल्याचा टोला त्यांनी हाणला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कुणीच थांबायला तयार नसल्याने शरद पवार यांचा तिळपापड झाला. नागपुरात गुंडगिरी वाढल्याचा आरोप करणाऱ्या पवारांवर येथील प्रत्येक व्यक्तिची दहशत असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी पळपुटे उमेदवार उभे केले. हे उमेदवार केवळ तांत्रिक निवडणूक लढवित आहे. कधी कुठे तक्रार करीत आहे, कधी कुठे जात आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. पाच वर्षांत मी काय केले याचा हिशेब देईन, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने 25 वर्षात काय केले यावर चर्चा करावी, असे आव्हान त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात विदर्भ, नागपूरसाठी योजना तयार केल्या. राज्यात 2022 नव्हे तर 2021 पर्यंतच सर्व गरिबांना घरे उपलब्ध होतील. नागपुरात आतापर्यंत अकरा हजार तयार केली. हजारो झोपडपट्टीवासींना पट्टे दिले. शिल्लक नागरिकांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. झुडपी जंगलाच्या जागेवरील झोपडपट्टीवासींनाही लवकरच मालकी पट्टे मिळतील, असे आश्‍वासन त्यांनी दिले. 
आंतरराष्ट्रीय शहर केल्याचे स्वप्न पूर्ण 
शहरात विविध विकासकामे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था, मिहानचा विकास केल्याचा दावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर केल्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले. संपूर्ण शहर बदलले असून युनायटेड नेशनने 2030 पर्यंत विकसित 30 शहरांच्या यादीत नागपूरचा समावेश राहील, असे भाकीत वर्तविले असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेकांनी मुंबई, पुण्यातून लढण्याची 'ऑफर' दिली. परंतु मी दक्षिण-पश्‍चिममधील मतदारांना सोडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 
मते यांना विधानसभेत पाठवा 
दक्षिण नागपुरातील काही वस्त्यांमध्ये अद्याप आरक्षण कायम आहे. मात्र तुम्ही चिंता करू नका. मोहन मते यांना आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवा. दक्षिणेतील शंभर टक्के वस्त्या नियमित केल्या जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री यांनी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील म्हाळगीनगर येथे झालेल्या जाहीर सभेत मतदारांना दिले. 
सुधाकर देशमुख कसलेले पहेलवान 
पश्‍चिम नागपूरचे भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख तेल लावलेले पहेलवान आहेत. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी विरोधकांकडे पहेलवानच नाहीत. देशमुख पाच वर्षांत स्वतःचे काम घेऊन कधीच आले नाहीत. आले तेव्हा पश्‍चिमच्याच विकासाची कामे घेऊन आले. पश्‍चिम माझी राजकीय कर्मभूमी असल्याने कधीच त्यांना रिकाम्या हाताने पाठविले नाही. त्यामुळे येथे तीनशे कोटींची विकासकामे होऊ शकली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com