esakal | खुशखबर! एक रुपयात मिळणार भरड धान्य, 'या' कुटुंबांना मिळणार लाभ

बोलून बातमी शोधा

coarse grain will get in 1 rupees in yavatmal}

गेल्यावर्षी तसेच यंदा मोठ्या प्रमाणावर मका, ज्वारीची खरेदी करण्यात आली आहे. माल शासकीय गोदामांमध्ये पडून आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना त्याचा लाभ मिळावा यासाठी रेशनकार्ड धारकांना त्याचे वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यात पाच लाख ५३ हजार ९५० शिधापत्रिकाधारक आहेत.

खुशखबर! एक रुपयात मिळणार भरड धान्य, 'या' कुटुंबांना मिळणार लाभ
sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील दोन लाख ७० हजार ६७१ कुटुंबांना तांदूळ, गहू सोबत मका, ज्वारी मिळणार आहे. मार्च महिन्यापासून याचे नियोजन असून अवघ्या एक रुपये किलोप्रमाणे त्याचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचा - पत्नीला मंगळ नसणे हे घटस्फोटाचे कारण नाही; उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका

गेल्यावर्षी तसेच यंदा मोठ्या प्रमाणावर मका, ज्वारीची खरेदी करण्यात आली आहे. माल शासकीय गोदामांमध्ये पडून आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना त्याचा लाभ मिळावा यासाठी रेशनकार्ड धारकांना त्याचे वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यात पाच लाख ५३ हजार ९५० शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये बीपीएल, अंत्योदय, प्राधान्य गट, केशरी कार्डधारक, शेतकरी गट, अन्नपूर्णा कार्डधारकांना धान्य वितरीत करण्यात येते. आतापर्यंत या कार्डवर गहू, तांदुळ, दाळ व साखर उपलब्ध झाली. गेल्या महिन्यापासून तूर डाळ बंद करण्यात आली. आता मार्च महिन्यापासून अंत्योदय कार्डधारकाला प्रति कार्ड पाच किलो गहू, १० किलो भरड धान्य आणि २० किलो तांदूळ तर प्राधान्य कुटुंबांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू, दोन किलो भरड धान्य, दोन किलो प्रति व्यक्ती तांदूळ मिळणार आहे. भरड धान्यासाठी रेशन दुकानात प्रत्येक किलोवर एक रुपया दर लागणार आहे. हे धान्य मिळताच गव्हाचा तितकाच कोटा कमी होणार आहे. 

हेही वाचा - थरार! मुलीला शून्य गुण का दिले म्हणून महाविद्यलयात काँग्रेसच्या महासचिवांचा...

लॉकडाऊन आणि कोरोना काळात प्राधान्य व अंत्योदय कुटुंबांना मोठ्या प्रमाणावर रेशन धान्याचा लाभ मिळाला होता. एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्याचे वितरण करण्यात आले. मार्च महिन्यापासून तांदूळ व गहू यांचे प्रमाण कमी करुन त्याचसोबत मका, ज्वारी व बाजरी देखील दिली जाणार असल्याने अशा कुटुंबांची आणखी सोय होणार आहे. 

अंत्योदय, प्राधान्य गटातील ग्राहकांना एक रुपया किलो दराने ज्वारी, मका दिला जाणार आहे. भरड धान्य वितरित करताना तितकाच गहू मात्र त्यांच्या कार्डवरून वजा करण्यात येणार आहे. बाजारात सध्या भरड धान्याचे भाव यापेक्षा पाच ते सहा पटीने अधिक आहेत. यामुळे शिधापत्रिका धारकांना दिलासा मिळेल. 
- सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी

शिधापत्रिका संख्या 

  • अंत्योदय - एक लाख ३० हजार १०७ 
  • प्राधान्य - एक लाख ४० हजार ५६४ 
  • शेतकरी - ७० हजार ९४८ 
  • एकूण- पाच लाख ५३ हजार ९५०