Video : टरबूज घ्या टरबूज... पाहिलेत का कधी विविधरंगी टरबूज? पिवळे, गुलाबी, हिरवे आणि लाल!

गणेश राऊत
शनिवार, 23 मे 2020

बाहेरून पिवळ्या रंगाचे व आतून गुलाबी, लाल रंगाचे, तसेच बाहेरून हिरव्या रंगाचे व आतून पिवळ्या रंगाचे टरबूज  नव्याने आले आहेत. नेर येथील प्रगतिशील, उद्यमी शेतकरी तथा व्यापारी आफरोच लकडकुट्टा यांचे शेतात हे विविध रंगांचे टरबूज बहरले आहेत.

नेर (जि. यवतमाळ)  : या  निसर्गात अनेक अनाकलनीय गोष्टी आहेत. त्यालाच आता सायन्सचीही जोड मिळाली आहे. शेती तंत्रही विकसित झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे चांगल्या दर्जाचे उत्पन्न येऊ लागले आहे.
 आश्‍चर्य असले तरी हे सत्य आहे. साधारणपणे आपण बाहेरून हिरव्या रंगाचे व आतून रसरशीत लाल रंगाचे टरबूज पाहिले आहे. परंतु आता बाहेरून पिवळ्या रंगाचे व आतून गुलाबी, लाल रंगाचे, तसेच बाहेरून हिरव्या रंगाचे व आतून पिवळ्या रंगाचे टरबूज  नव्याने आले आहेत. नेर येथील प्रगतिशील, उद्यमी शेतकरी तथा व्यापारी आफरोच लकडकुट्टा यांचे शेतात हे विविध रंगांचे टरबूज बहरले आहेत.

 

नेर येथील अजंती रोडलगत या व्यापारी तथा प्रयोगशील शेतकर्‍यांचे शेत आहे. या शेतात ते नेहमी नवनवीन प्रयोग करतात. एकंदरीत पारंपरिक पिकातून शेतकरी नगदी पिकाकडे वळले पाहिजे, यासाठी ते स्वतः प्रयोग करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतात. यावर्षी त्यांनी आपल्या शेतातील तीन एकरांत मार्च महिन्यांत टरबुजाची लागवड केली. योग्य देखभाल केल्याने टरबूज चांगले बहरले. पाच ते दहा किलोपर्यंत वजनाची फळे लगडली आहेत. यामध्ये त्यांना एकरी 12 हजार रुपये खर्च आला. परंतु कोरोनामुळे केवळ उत्पादन खर्च निघाला. त्यांनी आपल्या शेतात विविध जातीच्या टरबुजांची लागवड केली. यात बाहेरून पिवळा रंग असलेले ऑर्बी सीडस 3320, 12, 13, 14, मथुरा, मॅक्स, शुगर क्वीन, शुगर क्यूब, अशा व्हेरायटींचा समावेश आहे. यामध्ये त्यांना एकरी तीस टन एवढे उत्पादन झाले. बाहेरून पिवळ्या रंगाचे असलेले टरबूज आतून मात्र चक्क गुलाबी लाल रसरशीत रंगाचे आहे. तर बाहेरून हिरवे असलेले आतून गर्द पिवळ्या रंगांची आहे. जिभेवर या टरबुजाची चवही न्यारीच आहे. चवीला रसाळ गोड व मनालाही भुरळ घालणारे हे टरबूज पाहिल्यावर जिभेवर व मनावर आपला ताबा राहत नाही. आतून पिवळा रंग असलेले टरबूज हे एक्स्पोर्ट क्वॉलिटीचे आहे. हे टरबूज आपल्याकडे विकल्या जात नसून याची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. याचा दरही 30 रुपये किलो असा मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांना यापासून चांगला फायदा मिळतो. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळे देशांतर्गत बाजार व निर्यातही बंद असल्यामुळे टरबूज उत्पादकांना याचा मोठा फटका सहन करावा लागला.

सविस्तर वाचा - कर्जमाफी झाली, आता पीककर्ज देण्यास बँकेची ना, काय आहे कारण...
टरबूज खाल्ल्याने उष्माघाताचा धोका टळतो
टरबूजामध्ये मॅगनीज, प्रोटिन, व्हिटॅमिन ए, आयरन, पोटॅशियम असे विविध घटक असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत टरबुजाची मोठी मागणी असते. रसरशीत टरबूज खाल्ल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो. यामध्ये 90 टक्के पाणी असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत याचे सेवन करणे आरोग्याच्यादृष्टीने लाभदायक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colourfull watermelon avaible in market