नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

कोरोना संशयितांना येथील स्त्री रुग्णालयात असलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. यामध्ये मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ हे सुद्धा होते.

बुलडाणा : सोशल मीडियावर बनावट व्हिडीओ व्हायरल करून प्रशासनाची बदनामी केल्याप्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रेमचंद पंडित यांच्या तक्रारीवरून बुलडाणा पोलिसांनी ही कारवाई केली.

कोरोना संशयितांना येथील स्त्री रुग्णालयात असलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. यामध्ये मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ हे सुद्धा होते. मात्र, त्यांनी एक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. सदर व्हिडीओमध्ये त्यांनी केलेले आरोप सर्वथा चुकीचे व शासनाची बदनामी करणारे तसेच तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची करणारे होते. याप्रकरणी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी तातडीने या व्हिडीओ मधील सत्यता तपासण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांसह कारवाई सुरू केली होती. 

हेही वाचा - देशी दारूच्या काॅर्टरची किंमत 55 वरून 200 रुपये; येथे सहज होते उपलब्ध

मात्र, या व्हिडीओमध्ये तथ्य आढळून न आल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानुसार साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना सारख्या महामारीच्या काळात व आपत्तीच्या काळात सदर नगराध्यक्षांनी हा व्हिडिओ व्हायरल करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा व प्रशासना विरोधात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले होते. या शिवाय जिल्हाधिकारी श्री. रावळ यांचे नगरपालिकेचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात देखील कारवाई करणार असल्याचे कळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complaint has been registered against the city president Harish Rawal