बापरे! या तीन गावांचा तलाठी हरविला…गावकऱ्यांनी केली तहसीलदारांकडे तक्रार

प्रशिक मकेश्वर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

गावाच्या कारभाराची धुरा सरपंचावर असते तशीच तलाठ्यावरही असते. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कामासाठी तलाठीच महत्त्वाची भूमिका निभावत असतो. त्यामुळे गावातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी विविध कामासाठी तलाठ्याकडे जात असतात. मात्र एखाद्या गावाचे तलाठीच हरविले असेल तर...मग नागरिकांनी जावे कुणाकडे...अशीच घटना तिवसा तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील तीन गावांचा कारभार सांभाळणारे तलाठीच हरविल्याची तक्रार नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे.

तिवसा (जि. अमरावती) : एखादे मूल हरविले, वस्तू, दुचाकी, वाहन हरविल्याची तकार पोलिसांत नेहमीच केली जाते. हे आजवर आपल्याला माहीत आहे. मात्र एखाद्या गावाचे तलाठी हरविल्याची तक्रार चक्क गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

तिवसा तालुक्यातील अनकवाडी, मालधूर, रघुनाथपूर या तीन गावांतील तलाठी गेल्या सहा दिवसांपूर्वी गावात रुजू झाल्या होत्या. मात्र त्या आजवर गावात फिरकल्या नसल्याने काही शेतकऱ्यांनी तिवसा तहसीलदारांकडे तलाठी हरविल्याची तक्रार दिली आहे.

तीन गावे सांभाळणारा तलाठी गायब

वांना तालुक्यातील अनकवाडी, मालधूर, रघुनाथपूर ही कमी लोकसंख्येची गावे आहेत. येथे सर्वंच नागरिक शेतकरी, शेतमजूर, कास्तकार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज व इतरही कामाकरिता गावात तलाठी असणे गरजेचे झाले आहे. मात्र तलाठी मुख्यालयी न राहत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहनकरावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चक्क तलाठी हरविल्याबाबत तक्रार दिल्याने हास्यापद चर्चेला उधाण आले आहे.

लवकरात लवकर तलाठ्याला रुजू करा...अन्यथा

अनकवाडी, मालधूर येथील शेकडो शेतकऱ्यांनी काल तिवसा तहसील कार्यालयात येऊन संबंधित तलाठी गैरहजर राहत असल्यामुळे तक्रार दिली आहे. येथील शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेत प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच लवकरच तलाठी रुजू न झाल्यास युवा संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. यावेळी मनोज साबळे, सूरज धुमनखेडे, विकास तुरकाने, गजानन साबळे, प्रदीप साबळे, विजय डोंगरे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

महिला तलाठ्याला सहा गावांचा अतिरिक्त पदभार

तिवसा तालुक्यातील अनकवाडी, मालधूर, रघुनाथपूर, सालोरा, मौजातील एकूण सहा गावांचा अतिरिक्त पदभार एकाच महिला तलाठ्याचा खांद्यावर असून तिला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधी तीन गावांचा व नंतरही तीन गावांचा कारभार सोपवून शेतकऱ्यांना एकप्रकारे वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. एकाच कामाकरिता अनेक चकरा येथील शेतकऱ्यांना माराव्या लागत आहेत.

असं घडलंच कसं  : पैशाचे आमिष दाखवून तो चक्क ४० वर्षीय विवाहितेला म्हणाला... वाचा सविस्तर

माझ्याकडे अतिरिक्त पदभार
माझ्याकडे इतर गावांचा अतिरिक्त पदभार आहे; तरीसुद्धा मी या गावांचा पदभार घेतला. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजीसुद्धा घेत आहे. डीएससीचे काही अधिकार माझ्याकडे आले नाही. त्यामुळे इतर कागदपत्रे देण्याकरिता अडचणी येत आहेत. कोरोनामुळे गर्दी होणार नाही यासाठी बसण्याची तशी व्यवस्था नसल्याने अडचणी येत आहेत.
- एस. आर. सोळंके, तलाठी.

 

(संपादन :  दुलिराम रहांगडाले) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint of missing of talathi of three villages