
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत शुक्रवारी भागधारकांच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून भलतेच विषय गाजले. भागधारकांसाठी अपुऱ्या संख्येने भेटवस्तू आणल्याने सभेचा निम्मा वेळ याच विषयावर खर्ची पडला.
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (ता.27) भागधारकांच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून भलतेच विषय गाजले. भागधारकांसाठी अपुऱ्या संख्येने भेटवस्तू आणल्याने सभेचा निम्मा वेळ याच विषयावर खर्ची पडला. यावेळी भागधारकांना घरपोच बॅग पोचविल्या जातील, असे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख यांच्यासह इतर संचालक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना विविध जिल्ह्यातील भागधारक शेतकऱ्यांनी महाबीजच्या वतीने खरीप, रब्बी हंगामात केले जाणारे बीजोत्पादन, बियाणे उगवणीचे प्रश्न, बियाणे प्रमाणीकरण, महाबीजची प्रशासकीय यंत्रणा व शेतकऱ्यांमधील समन्वय याबाबत असंख्य प्रश्न उपस्थित केले. महाबीजचा बीजोत्पादन कार्यक्रम दरवर्षी कमी होत चालला आहे. दरवर्षी हे प्रमाण घटत जाऊन पर्यायाने शेतकरी व महाबीजचे नुकसान होईल, अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.
महाबीजने शेतकरी हित जोपासावे
शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या महाबीजने त्यांचे भागधारक तसेच शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी काम करायला पाहिजे. वार्षिक सभेत सर्व प्रश्न सुटत नाहीत. वेगवेगळ्या विभागांचे वेगवेगळे मुद्दे असून, त्यांना न्याय देता येत नाही. त्यामुळे महाबीजने शेतकरी व प्रशासनातील समन्वय वाढविण्याची गरज असल्याचे सांगत सर्वसाधारण सभेपूर्वी प्रत्येक विभागस्तरावर बैठका घेतल्या तर, सर्वच विभागातील शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल, अशी अपेक्षा वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांमध्ये धुसफूस
महाव्यवस्थापक आयएएस दर्जाचे आहेत, इतर अधिकारीसुद्धा उच्चशिक्षित आहेत तरीही भागधारकांसाठी भेटवस्तूचे (बॅग) नियोजन करताना गणिच चुकते कसे? 6400 भागधारकांना 1700 भेटवस्तूचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मूळ समस्या काय समजणार? संस्थेमध्ये ठरावीक ठेकेदार गब्बर होत आहेत. मूळ प्रश्न टाळण्यासाठी भेटवस्तूवर भागधारकांचे लक्ष वळविण्यात आले, अशी धुसफूस सभेवेळी शेतकऱ्यांमध्ये सुरू होती.
या प्रश्नावर घमासान
दोन लाख क्विंटल सोयाबीन बियाणे शिल्लक राहिल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले याकरिता जबाबदार कोण? खरीप व रब्बी 2019 च्या हंगामात थायरम व बियाण्याच्या पिशव्या वेळेवर पोहोचल्या नाही. त्यामुळे बियाण्याची प्रक्रिया उशिरा झाली व हरभरा बियाण्याची उगवण शक्ती निकाल उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे शेकडो क्विंटल बियाणे अपात्र ठरुन, महाबीज व बिजोत्पादकांचे नुकसान झाले. इत्यादी प्रश्नावर भागधारक शेतकरी आक्रमक झाले. त्यापैकी काही प्रश्नांवर चर्चा झाली तर, अनेक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने, भागधारकांनी नाराजी व्यक्त केली.