नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत संभ्रम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • अनेकांचा शरद पवार यांच्यावर विश्‍वास 
  • काहींसाठी अजित पवार यांचा निर्णय योग्य 
  • विविध वॉट्‌सअप ग्रुपवरील आढावा 
  • अनेकांचे फोन एंगेज 

भिवापूर (जि. नागपूर) : भाजपसोबत मिळून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घाईघाईत सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. घाईगडबडीत उरकलेल्या या शपथविधी सोहळ्यामुळे नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. सोशल मीडियावर ते व्यक्‍त होत प्रतिक्रिया देत आहेत. दै. "सकाळ'च्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या विविध वॉट्‌सअप ग्रुपवर जाऊन आढावा घेतला असता ही बाबा स्पष्ट झाली. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते व्यक्त होताना दिसत आहेत. काही कार्यकर्ते अजित पवार यांच्या निर्णयाला योग्य ठरवून त्यांना शुभेच्छा देत आहेत तर काही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवित त्यांच्या पाठिशी असल्याच्या पोस्ट व्हॉट्‌सअप, फेसबुकवर व्हायरल करीत आहेत.

अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाचा आहे की अजित पवारांचा आहे? या नेते अनभिज्ञ आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व काटोलचे आमदार अनिल देशमुख आणि जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. दोघेही मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे फोन एंगेज

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी फोनवरून संपर्क केला असता अनेकांचे फोन एंगेज दाखवत होते. काहींचे रिटर्न कॉल आल्यावर ते राष्ट्रवादीचेचे अन्य कार्यकर्ते व नेत्यांशी चर्चा करीत असून पुढील भूमिका ठरविण्याबाबत विचार विमर्ष करीत असल्याचे सांगितले. दरम्यान शरद पावार हेच आमचे शिर्षस्थ नेते असून, त्यांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची राहणार आहे, असे मत व्यक्‍त केले. 

कॉंग्रेसची भूमिका वेट ऍण्ड वॉच

सरकार स्थापन झाल्याचे वृत्त समजताच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे. कॉंग्रेसचे जिल्ह्यातील आमदार सुनील केदार व राजू पारवे हे मुंबईत असून, कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याची माहिती आहे. कॉंग्रेस सध्या वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत असून, पक्ष ठरवेल तेच योग्य, असे मत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केले. 

भाजपचा ठिकठिकाणी जल्लोष

देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे समजताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. उमरेडमध्ये फटाके फोडून उत्साह साजरा केला. तसेच अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंतद साजरा केला. 

शिवसेनेला बसला धक्‍का

भाजपने शपथविधी केल्याची बातमी समजताच जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांशी बोलून आढावा घेत होते. तसेच आपली भूमिका काय असावी यावर चर्चा करीत होते. शिवसेनेचे बंडखोर व रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जयस्वाल हे मुंबईत असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक शिवसैनिकांनी आशीष जयस्वाल यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

आम्ही शरद पवारांसोबतच 
अजित पवारांनी जे केले, त्याला महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही. अजित यांचा निषेध करतो. आम्ही पक्षासोबत आहोत, शरद पवारांसोबत आहोत. आम्ही सदैव पक्षासोबत राहू. 
- अनिल देशमुख, 
आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस

महाराष्ट्रातील अस्थिरता संपली 
राष्ट्रवादी व कॉंग्रेसने शिवसेनेला युतीतून वेगळे करण्याच पाप करून महाराष्ट्राला अस्थिरतेच्या खाईत लोटले होते. आता ही अस्थिरता संपली आहे. 
- डॉ. राजीव पोतदार, 
जिल्हाध्यक्ष, भाजप 

घर का भेदी लंका ढाए
अजित पवार यांचे असे वागण बरं नव्हे. घर का भेदी लंका ढाए. 
- देवेंद्र गोडबोले, 
शिवसेना उपजिल्हाप्रमुख, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion in nationalism