maharashtra vidhansabha 2019 : कॉंग्रेसला नको "सरप्राइज' उमेदवार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभात मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्हाला बाहेरचा "सरप्राइज' उमेदवार नको असल्याची मागणी मतदारसंघातील कॉंग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच विदर्भाचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांच्याकडे केली आहे.

नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभात मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्हाला बाहेरचा "सरप्राइज' उमेदवार नको असल्याची मागणी मतदारसंघातील कॉंग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच विदर्भाचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांच्याकडे केली आहे.
दै. "सकाळ'च्या शनिवारच्या अंकात "मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कॉंग्रेसचा "सरप्राइज' उमेदवार? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले. यामुळे दक्षिण-पश्‍चिमेतील इच्छुक कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे. बहुतांश नगरसेवकांनी यास विरोध दर्शवला आहे. वासनिक यांना केलेल्या तक्रारीत शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचाही समावेश आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते सुमारे 30 वर्षांपासून याच मतदारसंघात कार्य करीत आहोत. बाहेरचा उमेदवार लादल्यास सर्वांचे मनोबल खचेल व आत्मविश्‍वासुद्धा कमी होईल. त्यामुळे उमेदवार देताना याच मतदासंघातील कार्यकर्त्यांचा विचार करावा, अशी मागणीही केली आहे.
प्रभाग क्रमांक 16 मधील भक्ती पन्नासे, अरविंद गणवीर, विजय मांजरीकर, गीता यादव, प्रभाग 17 मधील नगरसेवक हर्षला साबळे, प्रशांत ढाकणे, शेखर पितळमुंडे, कल्पना सातपुते, प्रभाग 35 मधील पंकज थोरात, नंदा देशमुख, सधन यादव, प्रभाग 36 मधील किशोर उमाठे, प्रसन्न जिचकार, रेखा बाराहाते, अर्चना बडोले, प्रभाग 37 मधील विकास ठाकरे, प्रसन्न बोरकर, राधिका नासरे, प्रज्ञा पन्नासे, प्रभाग 38मधील उज्ज्वला बनकर यांच्या स्वाक्षरीनिशी मुकुल वासनिक यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून प्रफुल्ल गुडधे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यांची इच्छा पश्‍चिम नागपूरमध्ये आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. नरेंद्र जिचकार किंवा माजी आमदार आशीष देशमुख यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून कॉंग्रेस वर्तुळात चर्चा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress does not want "surprise" candidate?