आघाडीचे अधिकार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भूमिका
शिवसेनेसोबत क्षमता बघून आघाडीचा निर्णय

अकोला ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीन निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत आघाडी करताना क्षमता बघून निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेतल्या आढाव्यानंतर हा निर्णय घेतला.

अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदेसह राज्यातील पाच जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकीचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे. त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेवून स्वबळाची तयारी पूर्ण केली आहे. असे असले तरी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मित्र पक्षांशी आघाडी करण्याबाबत काँग्रेस अनुकूल आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी ही स्थानिक पातळीवर निश्‍चित मानली जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष शिवसेनेसोबत आघाडी करावी किंवा नाही याबाबत स्थानिक पातळीवर अद्यापही संभ्रम आहे. याबाबत शुक्रवारी मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीत स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडेही विचारणा केली. त्यावर काँग्रेस प्रदेसाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेसोबत आघाडीचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात येत असल्याचे जाहीर केले. ज्या ठिकाणी क्षमता असेल तेथे शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढविली जाईल असेही थोरात यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या अधिकारानंतर आता काँग्रेसचे स्थानिक नेते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

चाचपणी सुरू
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या अधिकारानंतर अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेसोबत आघाडीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर चर्चा झाली. त्यात शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. मात्र आघाडी करण्यावरून या बैठकीमध्ये मतभेद दिसून आलेत. शिवसेनेकडून पातूरसह काही तालुक्यात दोन्ही काँग्रेसला जिल्हा परिषदेसाठी जागा सोडण्यास फारशी अनुकूलता दर्शविली नसल्याची माहिती आहे. 

शिवसेनेकडून प्रतिदास मिळणे कठीण
अकोला जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही या पक्षांचे संख्याबळ अत्यल्प आहेत. त्या तुलनेत शिवसेनेचे बळ ग्रामीण भागात अधिक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आघाडी करावयाची झाल्यास शिवसेनेकडून मोठा वाटा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे आघाडीबाबत शिवसेना स्थानिक पातळीवर काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी प्रतिसाद देणे कठीणच आहे.

   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress president says akola zp election alliance rights at local leader