"देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी'

Corona causes artisans in big financial crisis
Corona causes artisans in big financial crisis

पवनी : फिरत्या चाकावर ओल्या मातीला हाताने आकार देऊन कुंभार नानाविध भांडी तयार करतो. त्याच हाताने मातीतून देवाच्या सर्वांगसुंदर मूर्ती घडविल्या जातात. या पारंपरिक व्यवसायावरच शेकडो कुटुंबाच्या घरातील दोनवेळची चूल पेटते. परंतु, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या व्यवसायाला मोठी झळ बसली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेली होरपळ संपलेली नाही. त्यामुळे उद्विग्न होऊन "देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या या जिवाची आग लागू दे तुझ्या उरी' अशी आर्त साद मूर्ती घडविणारे कारागीर देवाला घालत आहेत.

कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसायसुद्धा त्यातून सुटलेला नाही. दररोज कष्ट करून, घाम गाळून राबणाऱ्या लोकांच्या या व्यवसायाची टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे वाट लागली. मार्च महिन्यापासून उन्हाळा सुरू होतो. चार महिन्यांच्या कालावधीत माठ, सुरई, घागर ही थंड पाण्याची भांडी विकली जातात. याच काळात लग्नसराई असते. वैवाहिक कार्यक्रमासाठी कुंभारांकडून खास घंगाळ व मातीची भांडी तयार करवून घेतली जातात. परंतु, लॉकडाऊनच्या काळात हा धंदा पूर्णपणे बुडाला.

मातीचे तयार माठ न विकले गेल्याने कुंभारवाडीत हजारो रुपयांचा माल पडून आहे. माल ठेवायला जागा नाही. वर्षभर हे नाजूक सामान सांभाळून ठेवणे जोखमीचे काम आहे. माठ फुटल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. आता कुंभारांची उरलीसुरली भिस्त कान्होबा, गणेशोत्सव, नवरात्र व दिवाळीवर अवलंबून आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवावरही नियंत्रण येणार आहे. त्यामुळे ही मंडळी घरगुती प्रतिष्ठापनेसाठी तयार होणाऱ्या मूर्ती घडविण्याच्या तयारीला लागले आहेत.

पोळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव महिन्याभरावर आहे. निदान या काळात तरी आतापर्यंत झालेले नुकसान देवाच्या कृपेने भरून निघेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. घरगुती गणेश मूर्ती, श्रीकृष्ण, गोपिका, यांच्या मूर्ती बनविण्यात कुंभार समाज बांधव व्यस्त झाले आहेत. टाळेबंदीमुळे चार फुटांच्या वर मूर्ती बसविण्यास गणेशोत्सव मंडळांना मनाई आहे. त्यामुळे शहरातील मोठे मूर्तिकारसुद्धा घरगुती लहान मूर्ती तयार करण्यात सारी मगरळ व निराशा झटकून कामाला लागले आहेत.

श्रमाचे मिळेना मोल

शहरातील नेताजी वॉर्डात वरवाडे व खडसे हे कुंभार समाजाचे कुटुंब मातीची मडकी, भांडी, दिवे, कुंडी व देवदेवतांच्या मूर्ती तयार करतात. महागाईच्या काळात मातीचे साहित्य विकणे कठीण झाले आहे. मेहनत जास्त आणि मिळकत कमी असा प्रकार आहे. शहरालगतच्या तलावातून कुंभार उन्हाळ्यातच माती आणून ठेवतात. तलावात पाणी राहत असल्याने माती मिळत नाही. काही खासगी जागेवरून माती आणली जाते. मात्र, मनाई केल्याने तोही मार्ग बंद झाल्याचे प्रतिभा वरवाडे यांनी सांगितले. मातीची भांडी भट्टीत तापविली जातात. त्यासाठी काड्या विकत घ्याव्या लागतात. उत्पादन खर्च अधिक आणि मोल कमी अशा अडचणींमुळे नव्या पिढीतील तरुण व्यवसायापासून दुरावल्याचे वसंता वरवाडे यांनी सांगितले.


घरगुती मूर्ती घडविण्यावर भर
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात पाच ते दहा मोठ्या मूर्तींची ऑर्डर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त होते. आतापर्यंत एकच ऑर्डर आली. परंतु, कोरोना व लॉकडाउनमुळे यावेळी ही शक्‍यता फारच कमी आहे. त्यामुळे यंदा घरगुती गणेश व कान्होबा यांच्या मूर्ती घडविण्यावर भर आहे.
-प्रभाकर आरमोरीकर, मूर्तिकार, आझाद चौक

पुढील सणासुदीवर वर्षभराचे अर्थकारण
यावर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही आपले पोट कसे भरतो ते आम्हालाच ठाऊक. माझी तीन मुलेसुद्धा याच व्यवसायात आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. वृद्ध असूनही कोणापुढे मदतीसाठी हात पसरले नाहीत. पुढील काळात देवांच्या सणाला सुरुवात होत आहे. आता त्यावरच आमचा पुढचा रोजगार अवलंबून आहे.
-राजाराम वरवाडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com