कोरोनाच्या सावटाखाली बळीराजाची परीक्षा...मजुरांच्या तुटवड्याने शेतीमशागतीचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

काही आठवड्यांवर मॉन्सून येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेती मशागतीला पर्याप्त वेळ नाही. कोरोनाचे संकटही समोर आहे. अशा अनेक प्रश्‍नांमुळे शेतकरी गोंधळून गेला आहे. कसेबसे यातून मार्ग काढल्यावरदेखील नेमके कोणत्या पिकाचे उत्पन्न घ्यायचे, विषाणू संसर्गामुळे मजूर कुठून आणायचे, हादेखील प्रश्‍न त्यांना भेडसावत आहे.
 

अहेरी (जि. गडचिरोली) : कोरोना संसर्गाच्या सावटामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील वर्गात बढती मिळाली. मात्र, अनेक वाईट प्रसंगांना आधीच तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांना यंदा आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे. मॉन्सून काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकामांना सुरुवात कशी करायची, हा प्रश्‍न बळीराजाला सतावत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणी उद्‌भवत आहेत, त्यात शेतकरी आणि मजूरवर्ग अधिक भरडला जात आहे. लॉकडाउनला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला; तरीसुद्धा परिस्थिती आवाक्‍यात आली नाही. अशास्थितीत अपुऱ्या तयारीमुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. सद्य:स्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक व्यवसायांत बरेच बदल करण्यात आले. मात्र, शेती व्यवसाय अद्याप संभ्रमात आहे.

मजूर कुठून आणायचे?

अशिक्षितपणामुळे जिल्ह्यातील तसेच अहेरी उपविभागातील शेतकरी नव्या बदलापासून अनभिज्ञ आहेत. काही आठवड्यांवर मॉन्सून येऊन ठेपला आहे, शेती मशागतीला पर्याप्त वेळ नाही, कोरोनाचे संकट, अशा अनेक प्रश्‍नांमुळे शेतकरी गोंधळून गेला आहे. कसेबसे यातून मार्ग काढल्यावरदेखील नेमके कोणत्या पिकाचे उत्पन्न घ्यायचे, विषाणू संसर्गामुळे मजूर कुठून आणायचे, हादेखील प्रश्‍न भेडसावत आहे.

योग्य मार्गदर्शनाअभावी शेतकरी संभ्रमात

मागील हंगामातील कापूस शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात तसाच पडून आहे. पुढे कापसाला भाव मिळणार की नाही, याबद्दल साशंकता आहे. पीक बदल व पीक विविधता यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन आवश्‍यक झाले आहे. आगामी काळात मंदीचे सावट राहणार असून कापूस टाळून अन्नधान्य पिकवावीत, असा सूर दिसून येत आहे. यांत्रिक साधनावर अधिक भर देऊन अन्नधान्याचे पीक घेतल्यास शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहील, असे तज्ज्ञ सांगतात. परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी शेतकरी संभ्रमात असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येते.

यंत्रसामुग्रीचा पुरेपूर वापर करा : कृषी विभाग

कृषी यांत्रिकीकरण अभियानाअंतर्गत 2018-19 ते आजवर सुमारे 350 ट्रॅक्‍टर व औजारे शेतकऱ्यांना मिळाली आहेत. जवळपास तितकेच खासगी ट्रॅक्‍टर लोकांकडे आहेत. त्यामुळे शेतीला लागणारी यंत्रसामुग्री पुरेशी आहे. योग्य वापर झाल्यास मजुरांच्या टंचाईवर तोडगा निघेल. वेळेत तसेच खर्चातही बचत होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

जाणून घ्या : पोटाचा प्रश्‍न सोडवू, की कर्जाचे हप्ते फेडू, बचत गटाच्या महिला अडचणीत

बियाणे, खते थेट गावात उपलब्ध
यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे व खते वितरण प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. बियाणे व खते कृषी केंद्रावर उपलब्ध न करता प्रत्येक गावखेड्यात शेतकरी गट निर्माण करून शेतकऱ्यांच्या संख्येनुसार बियाणे व खत थेट त्यांच्याच गावात उपलब्ध केले जाईल. त्यामुळे कृषी केंद्रांवर गर्दी कमी होईल. गट स्थापन केल्याने सर्वांना समान न्याय मिळेल व काळाबाजारालादेखील आळा बसेल.
- सुरेश जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी, अहेरी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona crisis in Aheri, agriculture could not get labor