सैलानी से लौट जाओ...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

देशासह विदेशातील सर्वधर्मीय भक्तांचे  श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेवर यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता प्रशासनाने यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यासह देशभरातील भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, एकच गोंधळ उडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सुरक्षा आणि प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, मोठा फौजफाटा तैनात करण्याची हालचाली सुरू झाल्या आहे.

पिंपळगाव सराई (जि.बुलडाणा)  : देशासह विदेशातील सर्वधर्मीय भक्तांचे  श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेवर यंदा कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता प्रशासनाने यात्राच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यासह देशभरातील भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून, एकच गोंधळ उडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सुरक्षा आणि प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, मोठा फौजफाटा तैनात करण्याची हालचाली सुरू झाल्या आहे.

चीनमधील कोरोना व्हायरसचे सावट संपूर्ण जगावर दिसून येत असून, आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषदेसह इतर आरोग्य संघटनांनी त्याला महामारी म्हणून घोषित केले आहे. सैलानी यात्रेत दरवर्षी मोठ्याप्रमाणावर देशासह विदेशातूनही भक्त येत असतात. परंतु, यंदा यात्राच होणार नसल्यामुळे सर्वांची अडचण झाली आहे. केंद्र शासनाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना व्हायरस प्रतिबंधक आराखडा 3 मार्चनुसार बुलडाणा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या निर्देशाने सैलानी यात्रेला स्थगितीचा आदेश दिले असून, सैलानी यात्रेतील होळी व सैलानी बाबाचा संदल काढण्यात येणार नसल्याचे नमूद केले नसल्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी सक्तीने दिले आहे. सैलानी दर्गा यात्रा परिसरात वसलेल्या झोपड्या, हॉटेल, दुकाने उठविण्यास सुरवात करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. राज्यासह इतरत्र राज्यातून आलेल्या भाविकांनी सैलानी यात्रेनिमित्त एकत्र येऊन नये आणि परत जावे यासाठी प्रशासनाने पोलिस पथकाची नियुक्ती केली आहे. सैलानी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना यात्रा परिसरात नाक्यावर थांबवून परत जा अशा सूचना दिल्या जात आहे. कोरोना व्हायरसचा रुग्ण सैलानी यात्रेत जर आढळला तर त्यामुळे कोरोनांचा आजारग्रस्तांना फैलाव होण्याची शक्यता नाकारता येतानाही. सैलानी बाबाच्या यात्रेसाठी राजस्थान, हरियाना, तमिलनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, केरळ आदी राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे सैलानी यात्रेत कोरोना व्हायरस येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सैलानी यात्रेतील भाविकांना परत पाठविण्यात येत आहे. सैलानी यात्रेसाठी जवळपास 5 ते 6 हजारांच्यावर भाविक दाखल झाले असून, त्यांच्या झोपड्या हटवून त्यांना परत जा अशा सूचना दिल्या जात आहे.

प्रशासनाचा मोठा ताफा दाखल
जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या वतीने 10 पथक तयार करण्यात आले असून, ते भाविकांना परत जाण्याच्या सूचना करत आहे तर, पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या निर्देशात सैलानी यात्रेत येणार्‍या भाविकांना प्रतिबंध करण्यासाठी रायपूरचे ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी 25 अधिकारी, 275 पोलिस कर्मचारी, आरसीपी पथक, महिला सुरक्षा पथकांची नेमणूक करत अंमलबजावणी सुरू केली आहे.

भाविकांसह मनोरुग्णही अडचणीत
कोरोनाच्या प्रभावामुळे प्रशासनाने यात्रा, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आणली असून, यामुळे सैलानी येथे देशासह विदेशातून येणार्‍या भाविकांची गोची झाली आहे. येथे तब्बल महिनाभरापासून भाविक झोपड्या करुन मनोरुग्ण नातेवाईकांसोबत राहतात. परंतु, प्रशासनाच्या वतीने त्यांना हटविण्यात येत असल्यामुळे ऐन वेळेवर अडचण होत असून, ते इतर राज्यातील असल्यामुळे त्यांना भाषा समजण्यातही अडचण येत आहे.

एसटीचे मोठे नुकसान
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने यंदा सैलानी यात्रेकरिता जिल्ह्यातील सातही आगारातून 120 च्या वर बसेसचे नियोजन करण्यात आले होते. यात्रेच्या माध्यमातून महामंडळाला तब्बल 40 ते 50 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असते. बुलडाण्यासह जालना, परभणी, नांदेड, औरंगाबाद व इतर लगतच्या विभागातूनही मोठ्याप्रमाणावर बसेस धावत असतात. परंतु, यात्रा रद्द करण्यात आल्याने प्रशासनाच्या सूचनेचे पालन करत महामंडळाने एसटी फेर्‍याही संध्याकाळपासून बंद केल्याचे सांगितले आहे.

तीन ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड
कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने भाविक येणार्‍या सैलानी यात्रेला स्थगिती देण्यात आली आहे. तरी सैलानी यात्रा कोरोना विषाणू प्रसार नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यात्रा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना विषाणू प्रसार नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी बुलडाणा, शेगाव व खामगाव येथे तीन आयसोलेशन वॉर्ड स्थापन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the corona crisis, sailani yatra to be postponed